भारत-चीन सीमारेषेचा परिसर शनिवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. अमेरिकन भौगोलिक सर्वेक्षण संस्थेच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. पहाटे ४ वाजून १४ मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र भारत-चीन सीमारेषेपासून सर्वात नजीक असलेल्या पासीघाट आणि टेझू या  भारतीय शहरांपासून २४० किलोमीटरच्या परिसरात असल्याचे समजते. भूगर्भापासून साधारण १० किलोमीटर खोल अंतरावर भूकंप झाला. या भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीची माहिती आतापर्यंत मिळू शकलेली नाही. रॉयटर्सच्या माहितीनुसार, चीनमधील ज्या प्रदेशात भूकंपाचे हादरे बसले आहेत तो परिसर विरळ लोकसंख्येचा आहे. तसेच अरूणाचल प्रदेश आणि तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.