दहशतवाद्यांच्या कुटुंबातील महिलांना त्रास दिला तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच जम्मू- काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिला आहे. महिलांना त्रास दिल्यासंदर्भात आलेल्या तक्रारीची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही राज्यपालांनी दिले आहे.

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्याच्या कुटुंबातील महिलेला पोलिसांनी त्रास दिल्याची तक्रार आहे. पोलिसांनी दहशतवाद्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही अटक केली, तसेच या कारवाईदरम्यान कुटुंबातील एका महिलेचे कपडे पोलिसांनी फाडल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील वृत्त स्थानिक माध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते. या तक्रारींची दखल राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी घेतली आहे.

‘माध्यमांमधील वृत्तानुसार पुलवामा येथील एका दहशतवाद्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांना अटक करण्यात आली आणि कुटुंबातील महिलांना जम्मू- काश्मीर पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप आहे. याची दखल आम्ही घेतली असून पोलिसांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना त्रास देऊ नये’, अशा सुचना पोलिसांना दिल्याचे मलिक यांनी सांगितले. अशा तक्रारींची चौकशी करुन दोषी आढळल्यास संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशा सुचना पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी एका दहशतवाद्याच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील महिलांना त्रास दिल्याचे ट्विट केले होते. पुलवामा येथे दहशतवाद्याच्या कुटुंबातील महिलेला पोलिसांनी त्रास दिला, तिला मारहाण करण्यात आली असून या मारहाणीमुळे ती महिला गंभीर जखमीही झाली आहे, असेही मुफ्ती यांनी म्हटले होते. राज्यपालांनी या घटनेत लक्ष घालून भविष्यात अशा घटना पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही मुफ्ती यांनी केली होती.