‘अदानी एण्टरप्राइझेस’ या खाणक्षेत्रातील बडय़ा भारतीय कंपनीच्या प्रस्तावित कारमायकेल कोळसा खाणीविरोधात शनिवारी ऑस्ट्रेलियात मोठय़ा प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. कारमायकेल कोळसा खाण ही ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी खाण ठरली असती मात्र पर्यावरण आणि आर्थिक प्रश्नांमुळे तिला विलंब झाला आहे.

क्वीन्सलॅण्ड राज्यातील खाणीमुळे ग्लोबल वॉर्मिगला हातभार लागून ग्रेट बॅरिअर रीफला धोका निर्माण होईल, असा पर्यावरणाशी संबंधित गटांचा दावा आहे.

‘स्टॉप अदानी’ चळवळ उभारण्यात आली असून त्यांनी जवळपास ४५ ठिकाणी निदर्शने केली. सिडनीतील बोण्डी किनाऱ्यावर एक हजारांहून अधिक नागरिकांनी ‘स्टॉप अदानी’ मानवी चिन्हं तयार केले होते. करदात्यांच्या पैशांतून या खाणीला अब्जावधी डॉलरचे कर्ज देण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियातील निम्म्याहून अधिक नागरिकांनी या खाणीला विरोध केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

या प्रकल्पामुळे स्वामित्वधन आणि करांच्या स्वरूपांत अब्जावधी डॉलर मिळतील, रोजगारनिर्मिती होईल आणि भारतात कोळसा निर्यात केल्याने ग्रामीण भागांत विजेचा पुरवठा करण्यास मदत मिळेल, असे अदानी कंपनीने म्हटले आहे. नॉर्दर्न ऑस्ट्रेलियन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीकडून (एनएआयएफ) प्रस्तावित खाणीला जोडणाऱ्या रेल्वेसाठी ७०४ दशलक्ष डॉलरचे कर्ज मिळणार आहे.

मात्र वाणिज्यिक बँकांनी सर्व कर्ज उचलल्यास आम्हाला एनएआयएफची गरजच नाही, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयकुमार जनकराज यांनी म्हटले आहे.

दी ऑस्ट्रेलियन कॉन्झव्‍‌र्हेशन फाऊण्डेशनचे अध्यक्ष जेफ कझिन्स हे देशातील बडे उद्योगपती असून त्यांनी, एनएआयएफच्या कर्जाविना अदानी प्रकल्पाचे काम सुरू करण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. वाणिज्यिक निधी मिळविण्याचे त्यांनी जोरदार प्रयत्न केले, मात्र कोणत्याही बँकेने त्यांना प्रतिसाद दिला नाही, असेही कझिन्स म्हणाले.