पाकिस्तानात शनिवारी शक्तिशाली भूकंपात ८९ जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर मापनावर ६.९ होती. देशाच्या अनेक भागांसह अफगाणिस्तानच्या हद्दीलगतपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर भारत व काश्मीरमध्येही भूकंपाचा जोरदार धक्का बसला असून, ऐन थंडीत रात्रीच्या वेळी लोकांना सुरक्षेसाठी घराबाहेर पळावे लागले. दिल्लीतही लोक या धक्क्यामुळे घराबाहेर पळाले. ईशान्य अफगाणिस्तानात भूकंपाचा धक्का बसला व या देशातच त्याचा केंद्रबिंदू होता. काबूलमध्ये लोक घराबाहेर पळाले.
भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात १९६ कि.मी. खोलीवर होते. या भूकंपाचे धक्के ताजिकीस्तान व भारतातही जाणवले, असे हवामान खात्याचे महासंचालक गुलाम रसूल यांनी सांगितले.
या भूकंपात प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. अमेरिकेच्या भूगर्भसर्वेक्षण वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात हिंदुकुश पर्वतराजीत २०३ कि.मी. खोलीवर होते व या भूकंपाची तीव्रता ६.३ होती. पेशावर येथे ५९ लोक जखमी झाले आहेत, तर स्वात खोऱ्यात १७ तर दिर लोअर जिल्हय़ात १२ व बुनेर जिल्हय़ात १ याप्रमाणे जखमींची संख्या आहे. जखमींना लेडी रिडिंग रुग्णालय, खैबर टिचिंग हॉस्पिटल व हयाताबाद येथे दाखल करण्यात आले आहे. घबराटीच्या वातावरणाने जास्त प्रमाणात लोक जखमी झाले. भूकंपाने दरडी कोसळून कारकुरम महामार्ग रोखला गेला.
ही घटना अप्प कोहिस्तान जिल्ह्य़ात घडली असून, तेथे आता वाहतूक सुरळीत झाली आहे. पाकिस्तानमध्ये लाहोर, नानकाना साहिब, फैसलाबाद, सरगोधा, शेखपुरा, मुलतान, सियालकोट, गुजरात, झेलम, मुरी, मलाकंद, चारसदा, मनसहरा, स्वात, हांगू, स्वाबी चित्राल व दक्षिण वझिरीस्तान येथे भूकंपाचा धक्का जाणवला. २६ऑक्टोबरला पाकिस्तान व ईशान्य अफगाणिस्तानात भूकंप होऊन २०० लोक मृत्युमुखी पडले होते. गेल्या महिन्यात पाकिस्तानात ५.९ रिश्टरचा भूकंप झाला होता. त्या वेळीही देशाच्या अनेक भागांत धक्के
जाणवले होते.

उत्तर भारत, काश्मीरमध्ये धक्के
हिंदूुकुश पर्वतराजीत केंद्र असलेल्या भूकंपाचे धक्के भारतात उत्तर भारत व काश्मीरमध्ये जाणवले आहेत. नॅशनल सिस्मॉलॉजी सायन्सेस विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे त्याची तीव्रता ६.५ रिश्टर होती. पहाटे १२.४४ वाजता भूकंपाचा धक्का बसला. प्राणहानी तसेच वित्तहानीचे वृत्त नाही. राजधानी दिल्लीत लोक भूकंपामुळे घराबाहेर पळाले. कडाक्याच्या थंडीत भूकंपामुळे काश्मीरमध्येही लोकांना घराबाहेर पळावे लागले. जम्मू-काश्मीरच्या हवामान केंद्राने सांगितले, की मालमत्ता व वित्तहानी झाली की नाही हे आत्ताच सांगणे शक्य नाही.आम्ही गाढ झोपेत असताना अचानक भूकंप झाला व आम्ही जीव वाचवण्यासाठी मोकळय़ा जागेत पळालो असे जम्मू येथील सुरजित कौर यांनी सांगितले. जम्मूच्या अनेक जिल्हय़ांतून भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या बातम्या येत असून, मोबाइल लाइन्स नातेवाइकांनी एकमेकांना मोठय़ा प्रमाणात फोन केल्याने ठप्प झाल्या होत्या. सामाजिक माध्यमांवरही संदेशांचा पूर आला आहे.