अमेरिकेच्या इतिहासातील मोठय़ा हत्याकांडात वीस वर्षे वयाच्या माथेफिरू तरुणाने अंदाधुंद गोळीबारात २० चिमुरडय़ा शाळकरी मुलांसह २६ जणांना ठार केल्याच्या घटनेनंतर आता हल्लेखोराने नेमके कोणत्या उद्देशाने हे कृत्य केले असावे याचा शोध पोलीस घेत आहेत, त्याचबरोबर अमेरिकेतील बंदूक वापराच्या कायद्यात काही बदलांची आवश्यकता जोरदारपणे प्रतिपादित करण्यात आली आहे.
हल्लेखोराचे नाव अ‍ॅडम लांझा असे असून त्याने सँडी हूक एलिमेंटरी स्कूल या शाळेत शुक्रवारी सकाळी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात पाच ते दहा वयोगटातील मुलांसह २६ जण ठार झाले होते. नंतर या हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून घेतली. पोलिसांनी सांगितले की, दुसरी एक प्रौढ व्यक्ती गुन्ह्य़ाच्या ठिकाणी मारली गेली असून प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार ती मारेकऱ्याची आई नॅन्सी लांझा असावी. सर्व मृतांची नावे तसेच आणखी माहिती शनिवापर्यंत हाती येईल असे पोलिसांनी सांगितले असून आईवडिलांकडून मृतांची ओळख पटवल्यानंतर बारा तासांनी पोलिसांनी मृतदेह हलवण्यास सुरुवात केली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी मृतांच्या आईवडिलांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले.
 अशा दुर्घटना टाळण्यासाठी अर्थपूर्ण कारवाई करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली असून रेडिओ व इंटरनेटवरील भाषणात बंदूक नियंत्रण कायदा अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत. दूरचित्रवाणीवर देशाला उद्देशून भाषण करताना ओबामा यांच्या डोळ्यात पाणी आले. आमची हृदये विदीर्ण झाली आहेत असे ते म्हणाले.न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार हल्लेखोराने सिंग सॉयर व ग्लॉक या दोन हँडगन या बंदुका वापरल्या तसेच हल्ल्याच्या ठिकाणी बुशमास्टर .२२३ एम४ कार्बाइन रायफलही सापडली आहे.