भारताने शनिवारी पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील प्रभारी राजदूतांना पाचारण केले आणि पाकिस्तानी फौजांनी जम्मू- काश्मिरात नियंत्रण रेषेवर अनेक भागांमध्ये विनाकारण शस्त्रसंधीचा भंग केल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला.

नियंत्रण रेषेवर समन्वयाने गोळीबार करून जम्मू- काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी व तेथे हिंसाचार घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने भारतातील सणांचा काळ निवडला हे अतिशय खेदजनक असल्याचे सांगून पाकिस्तानी फौजा ज्या प्रकारे निष्पाप नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य करत आहेत, त्याचा भारताने जास्तीतजास्त कडक शब्दांत निषेध केला, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले.

‘परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील प्रभारी राजदूतांना शनिवारी पाचारण केले आणि जम्मू- काश्मिरात नियंत्रण रेषेवर अनेक भागांमध्ये केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाबद्दल निषेध नोंदवला. या गोळीबारात ४ निष्पाप नागरिकांचा मृत्यू ओढवला असून १९ जण गंभीर जखमी झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले’, अशी माहिती मंत्रालयाने दिली.

नागरिकांव्यतिरिक्त सुरक्षा दलांचे ५ जवानही या गोळीबारात मारले गेले आहेत. भारतीय फौजांनी पाकिस्तानी गोळीबार व  तोफगोळ्यांच्या माऱ्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले असता ८ पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर १२ जखमी झाले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

सीमेपलीकडून दहशतवाद्यांना भारतात घुसण्यासाठी मदत करत असून, पाकिस्तानी फौजा गोळीबार करून त्यांना संरक्षण देत आहेत, याबाबतही भारताने जोरदार निषेध नोंदवला. आपल्या ताब्यातील भूमीचा भारताविरुद्ध दहशतवादासाठी कुठल्याही प्रकारे वापर न करू देण्याबाबत असलेल्या द्विपक्षीय बांधिलकीची पाकिस्तानला पुन्हा एकदा आठवण करून देण्यात आली, याचाही मंत्रालयाने निवेदनात उल्लेख केला आहे.