करोनाची दुसरी लाट तीव्र असली तरी तिचा सामना करण्यात आपण राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात दिली. करोना विषाणू व लसीकरणाबाबत अफवांना बळी न पडता तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

मन की बात कार्यक्रमाचा ७६ वा कार्यक्रम रविवारी प्रसारित करण्यात आला, त्यावेळी त्यांनी सांगितले की, कोविड १९ आपली परीक्षा घेत असताना मी तुमच्याशी बोलत आहे. लोकांची वेदना सहन करण्याची कसोटी करोनाची साथ बघत आहे. पहिल्या लाटेच्या वेळी देशाचे मनोधैर्य वाढले होते, आत्मविश्वास द्विगुणित होता, पण दुसऱ्या लाटेत देश हादरला आहे.

देशातील लोकांनी लसीकरण करून घेऊन कोविड १९ वर मात करण्यात मदत करावी, असे सांगून ते म्हणाले की, सरकारचा मोफत लसीकरणाचा कार्यक्रम यापुढेही सुरू  राहणार आहे. राज्यांनी मोफत लसीकरणाचा फायदा घ्यावा व जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करावे. केंद्राने राज्यांना मोफत लशी पाठवल्या होत्या. ४५ वर्षे वयावरील व्यक्तींना मोफत लस दिली जात आहे. १ मेपासून १८ वर्षे वयावरील व्यक्तींना लसीकरण खुले करण्यात येत आहे. जिद्दीच्या जोरावर आपण विषाणूवर मात करू शकतो. दुसरी लाट आलेली असताना सकारात्मकतेने त्याचा सामना करण्याची गरज आहे.

आपले आरोग्य कर्मचारी व डॉक्टर हे कोविड १९ लढाईत आपली मोठी मदत करीत आहेत. अनेक डॉक्टर ऑनलाइन पद्धतीने रुग्णांना सेवा देत आहेत.  वर्षभरात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना वेगवेगळे अनुभव आले आहेत. लोकांनी खोट्या बातम्यांना बळी पडू नये. कोविड १९ बाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे त्यावर विश्वास ठेवू नये. कुठल्या स्रोताकडून आपल्याला माहिती मिळत आहे याचा शोध घ्यावा, विषाणू व साथीविषयी चुकीची माहिती पसरवू नये. लशींबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन मोदी यांनी केले.

रेमडेसिविरच्या मागे धावू नका- शशांक जोशी

महाराष्ट्राच्या कोविड प्रतिबंधक पथकातील डॉ. शशांक जोशी यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला. शशांक जोशी यांनी सांगितले की, रुग्णांची संख्या वाढत असली तर मोठ्या प्रमाणात लोक बरेही होत आहेत त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.  दुसरी लाट खूप वेगाने आली. पण रुग्ण बरे होण्याचा दरही वेगात आहे. या टप्प्यात तरुण लोक व मुले यांनाही संसर्ग झाला. यातील लक्षणे कमी अधिक प्रमाणात सारखी होती. सुमारे ८०-९० टक्के लोकांना कुठली लक्षणे दिसली नाहीत. उत्परिवर्तनाबाबत चिंता करण्याचे कारण नाही. आपण जसे कपडे बदलतो तसे विषाणू आपले रूप पालटत असतात. अनेक लोकांनी लक्षणे जातील असे समजून उशिरा उपचार सुरू केले. व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्डवर विसंबून राहू नये. कोविडची साधी लक्षणे, मध्यम लक्षणे व  तीव्र लक्षणे असे तीन टप्पे आहेत. रेमडेसिविर हे प्रायोगिक औषध असून त्यामुळे रुग्णालयातील कालावधी एक दिवसाने कमी होऊ शकतो, त्यामुळे या औषधाच्या मागे धावण्याची गरज नाही.

आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद

पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य क्षेत्रात काम करणारे श्रीनगरचे डॉ. नावेद नझीर शाह, रायपूरच्या सिस्टर भावना ध्रुव , बेंगळुरूच्या सिस्टर सुरेखा, रुग्णवाहिका चालक प्रेम वर्मा, कोविडमधून वाचलेल्या गुरुग्रामच्या प्रीती चतुर्वेदी यांच्याशी संवाद साधला. लसीकरणानंतर कोविड संसर्ग झाल्याबाबत डॉ. नावेद यांनी सांगितले की, लसीकरणानंतरही संसर्ग होऊ शकतो. पण त्याची तीव्रता कमी असते. सिस्टर सुरेखा यांनी सांगितले की, कुठल्याही लशीने १०० टक्के सुरक्षितता मिळत नाही. प्रतिकारशक्ती तयार होण्यास वेळ लागतो त्यामुळे घरात रहा, नाक, तोंड यांना हात लावू नका, काढा पित रहा.

तुम्हाला जर करोनाबाबत काही माहिती हवी असेल तर ती योग्य स्रोताकडून मिळवण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या कौटुंबिक डॉक्टरांशी संवाद साधा, त्यांच्याशी दूरध्वनीवर बोला. अनेक डॉक्टर्स लोकांशी बोलून माहिती देतात. त्यांना औषध उपाययोजना सुचवतात. दवाई भी कडाई भी हा करोनाच्या आताच्या साथीला तोंड देण्याचा मूलमंत्र राहील. त्याचा अर्थ औषधे घ्यावीत पण त्याच्या जोडीला प्रतिबंधात्मक उपाय सोडू नयेत. सामाजिक अंतर, मुखपट्टी, साबणाने हात धुणे हे ते प्रतिबंधात्मक उपाय आहेत. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान