पश्चिम बंगालमध्ये आज भाजपा कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. राज्य सरकारचा निषेध करत बिपीन बिहारी गांगुली मार्गावरून लाल बाजारच्या दिशेने निघालेल्या व आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या शिवाय पाण्याचे फवारे देखील सोडले. यामुळे येथील परिस्थिती अधिकच चिघळताना दिसत आहे. आंदोलकांकडून हातात भाजपाचा झेंडा घेऊन ‘जय श्रीराम’ ही घोषणा देत राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

भाजपा कार्यकर्त्याच्या मृत्यू विरोधात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाल बाजार परिसरातील पोलीस मुख्यालायास घेराव दिला होता. आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये महिलांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर आहे. जवळपास एक लाख कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस मुख्यलयाबाहेर भाजपाचा झेंडा फडकवत असणा-या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भाजपाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आलेली आहे.

मोर्चा काढला जात असलेल्या संपूर्ण मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोलकात्ता शिवाय हावडा व सियालदह येथे देखील भाजपाच्यावतीने राज्य सरकार विरोधात निदर्शने केली जात आहेत. या अगोदर मंगळवारी हावडा येथे भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.