सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटीबाबत दिलेल्या निर्णयानंतर २ एप्रिल रोजी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ दरम्यान आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने जीव गमावणारा १२ वर्षीय निखील आज जर जिवंत असता तर त्याच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला असता. निखील पाचवीत शिकत होता. बुधवारी जेव्हा त्याचं प्रगतीपुस्तक त्याच्या पालकांच्या हातात आलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. निखील त्याच्या वर्गात पहिला आला होता. जखमी होऊन जीव गमावणारा १२ वर्षीय निखील आयुष्याच्या परिक्षेत भलेही नापास झाला असला तरी शाळेच्या परिक्षेत मात्र त्याने पहिला क्रमांक मिळवला. त्याचा हा निकाल नापास झालेल्या यंत्रणेसाठी एक चपराक आहे.

२ एप्रिलला भारत बंद आंदोलनादरम्यान पोलीस आणि प्रशासन सतर्क राहिलं असतं तर कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला नसता. कदाचित निखिललाही विनाकारण आपला जीव गमवावा लागला नसता. निखीलच्या पालकांचं दुख: एवढ्यावरच थांबलेलं नाही. न्यायासाठी त्यांना अजूनही पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे.

निखील जखमी झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांना कळवलं होतं. पण त्यांनी आधी त्याच्यावर उपचार करण्याचा सल्ला दिला. यानंतर जेव्हा त्यांनी तक्रार करण्यासंबंधी विचारलं, तेव्हा त्यांना मुलग पूर्ण बरा झाल्यानंतर या असं सांगण्यात आलं होतं. पोलिसांनी मीडियालाही एखादा मुलगा जखमी झाल्याची माहिती दिली नव्हती.

निखीलच्या मृत्यूला आठवड्यापेक्षा जास्त वेळ उलटला असतानाही अद्याप पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही. आपण रोज रुग्णालयाच्या फेऱ्या मारत असूनही आपल्याला रिपोर्ट देत नसल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. पोलीस मात्र दिल्लीच्या रुग्णालयांमधील प्रक्रियेमुळे वेळ लागत असल्याचं सांगत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण
नीरज कुमार यांचा मुलगा निखील २ एप्रिलला आपल्या मावशीच्या घरी गेला होता. सकाळी ११ वाजता चालत तो आपल्या घरी येत होता. यावेळी काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांची बाइक जाळली आणि धावपळ सुरु झाली. यावेळी निखील तिथेच होता. यावेली कोणीतरी आपल्या मुलाला धक्का मारला आणि तो आगीत पडला असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. आगीत भाजल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ७ एप्रिलला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.