जयपूर : समाजात फूट पाडणाऱ्या नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात विद्यार्थी व महिलाही रस्त्यावर उतरल्या त्यामुळे सर्वानाच या दोन्ही आक्षेपार्ह गोष्टींच्या विरोधात  बोलण्याचे बळ मिळाले. निदर्शने व आंदोलने ही महत्त्वाची आहेत कारण त्यातून लोकांना वास्तव चित्र समजते असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेत्री नंदिता दास यांनी जयपूर साहित्य महोत्सवात व्यक्त केले.

‘मंटो’  चित्रपटाच्या दिग्दर्शक असलेल्या दास यांनी सांगितले की , लोकांना दुसरी फाळणी नको आहे, सध्याच्या भीतीच्या वातावरणाविरोधात ते आवाज उठवण्याची हिंमत दाखवत आहेत. शाहीनबागसह सगळीकडे निदर्शने व आंदोलनात महिला व विद्यार्थी सहभागी झाले. त्यांच्या या कृतीतून सर्वानाच बोलण्याची हिंमत आली. काही वेळा निदर्शनांची व्याप्ती वाढवण्यासाठी नव्हे तर तुमच्यातील विवेकाला साद घालण्यासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे असते. काही वेळा आपण एकटे नाही हे स्वत:ला पटवण्यासाठी अशी आंदोलने गरजेची असतात. ते तुम्हाला घाबरवू शकतात, त्यासाठी त्यांच्याकडे अनेक मार्ग आहेत. त्यावर मात केली पाहिजे. तुम्ही तुमच्या धारणांवर ठाम असाल, तर आपोआप नैतिक धैर्य तुमच्यात येते. ते शोधावे लागत नाही.

नागरिकत्व कायदा व नागरिकत्व नोंदणी या दोन्ही गोष्टी घातक व समाजात दुही माजवणाऱ्या असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, आता जी आंदोलने झाली त्यातून लोकांना वास्तवाचे भान आले व त्यांच्यात एक जुटीची भावना निर्माण झाली. जर आज मंटो जिवंत असते तर त्यांनीही तुम्ही फाळणीतून काहीच शिकला नाहीत का, हाच प्रश्न  केला असता. लोकांना पुन्हा फाळणी नको आहे. तुम्ही स्वत:च स्वत:वर बंधने घालून घेऊ लागता तेव्हा ते जास्त घातक असते.