जम्मू काश्मीरमध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. उच्च माध्यमिक शालेय परिक्षांना सुरू झाल्याने जम्मू काश्मीरमधील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्याने राज्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र काश्मीर खोऱ्यातील शाळा अशांततेमुळे अद्याप बंदच आहेत.

‘राज्यातील ९५% शाळा सुरू झाल्या आहेत. बारावीच्या परिक्षादेखील सुरू झाल्या आहेत. राज्याच्या कोणत्याही भागात कोणतीही हिंसक घटना घडलेली नाही,’ अशी माहिती राज्य सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. विरोधकांनी मात्र राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. ‘भाजप-पीडीपी सरकार शाळा पुन्हा सुरू करुन राज्यात सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र उभे करु पाहात आहे,’ असा आरोप विरोधकांनी केला आहे.

सार्वजनिक वाहतूक यंत्रणा ठप्प असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर नेण्यासाठी खासगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करत आहेत. शेजारी आणि नातेवाईकांकडून वाहने घेऊन पालक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर नेत आहेत.

‘बारावीच्या परिक्षांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती ९४.८८% इतकी आहे. बडगाममध्ये सर्वाधिक ९८.१०% उपस्थितीची नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची ही उपस्थिती गेल्या वर्षापेक्षा अधिक आहे,’ अशी माहिती जम्मू आणि काश्मीरच्या माहिती विभागाचे संचावक शाहिद चौधरी यांनी ट्विटरवर दिली आहे.

‘काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. मात्र परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवल्या,’ अशी माहिती पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) एस. पी. वैद्या यांनी दिली आहे.