केरळमध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून शेकडो लोकांना प्राण गमावावे लागले आहेत तर हजारोंच्या संख्येने लोक बेघर झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या केरळाला अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये अगदी नेत्यांपासून बॉलिवूडमधील कलाकार आणि परदेशातील भारतीयांचाही समावेश आहे. मदतीसाठी सरसावलेल्यांमध्ये आणखीन एका नावाचा समावेश झाला आहे. आज ईदच्या निमित्ताने अहमदाबादमधील इस्लामिक स्टुडण्ट ऑर्गनायझेशनने (इस्लामिक विद्यार्थी संघटना) केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला.

विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते अहमदाबादमधील जामा मशीदींच्या परिसरामध्ये केरळ पूरग्रस्तांसाठी मदत निधी असे संदेश असणारे बॅनर्स घेऊन उभे राहिले होते. ईदनिमित्त नमाज पठणासाठी मशीदीमध्ये येणाऱ्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे या बॅनरसमोर ठेवलेल्या चादरींमध्ये रोख रक्कमेच्या स्वरूपात मदत दिली. यासंदर्भातील व्हिडीओ टाइम्स ऑफ इंडियाने पोस्ट केला आहे. अहमदाबादमधील अहमदाबाद केरळ समजाम या संस्थेने केरळमध्ये पूर आल्यानंतर आपले काही स्वयंसेवक मदकार्यासाठी पाठवले होते. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या जन्मभूमी असणाऱ्या केरळात जाऊन मदत करावी असेही या संस्थेने आवाहन केले आहे.