बंगळुरूमधील महाविद्यालयात शिल्पकलेचा अभ्यास करणाऱ्या केरळमधील विद्यार्थ्यांचा रॅिगगने बळी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत २१ वर्षीय युवकाच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  
याप्रकरणी कोची पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत गुजरातमधील पाटण जिल्ह्य़ात आठ एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी १८ कनिष्ठ विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बंगळुरू येथील आचार्य तंत्रशिक्षण महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या अहब इब्राहिम या विद्यार्थ्यांचा मारहाणीमुळे सोमवारी रात्री कोची येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
महाविद्यालयातील सहा वरिष्ठ विद्यार्थ्यांनी २७ जानेवारी रोजी इब्राहिमला बाथरूममध्ये मारहाण केली होती.  त्याला केरळ येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली, असा आरोप नातेवाईकांनी केला.