उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकार मदरसामधील शिक्षणाला नवे रूप देण्याची तयारी करत आहे. अल्पसंख्याक प्रकरणाचे राज्यमंत्री मोहसिन रझा यांनी लवकरच सरकार मदरसांसाठी ड्रेस कोड लागू करणार असल्याची माहिती दिली. आतापर्यंत मदरसामध्ये कुर्ता आणि पायजमामध्ये दिसतात. यापूर्वी योगी सरकारने मदरसांमध्ये एनसीईआरटी अभ्यासक्रम लागू केला आहे.

रजा म्हणाले की, या प्रकरणी प्रस्ताव तयार केला जात आहे. मदरसा शिक्षण व्यवस्थेला नवीन ओळख देण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे. पण अजून या मुलांना कोणता पोशाख असावा हे निश्चित झालेले नाही.

इतर शैक्षणिक संस्थांप्रमाणे मदरसांमध्ये आम्हाला बदल करायचे आहेत. मदरसाही इतर शैक्षणिक संस्थांप्रमाणे काम करावेत असे आम्हाला वाटते. आतापर्यंत मदरसामध्ये शिकणारे मुले कुर्ता-पायजमा घालत. आता आम्ही लवकरच त्यांच्यासाठी ड्रेस कोड आणण्याची तयारी करत आहोत. आम्ही त्यांना युनिफॉर्म पुरवू, असे रझा म्हणाले.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी योगी सरकारने राज्यातील मदरसांमध्ये एनसीईआरटीच्या पुस्तकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हा निर्णय आता अडचणीत आल्याचे दिसत आहे. एप्रिलपासून नव्या शैक्षणिक सत्रास सुरूवात झाली आहे. परंतु, अजूनही मदरसांमध्ये पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत.