जगभर पसरलेल्या करोना विषाणुमुळे काय स्थिती निर्माण झाली आहे, याची कल्पना सगळ्यानाच येऊ लागली आहे. तर अनेक देशांमध्ये करोनाचा साथी नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. ब्रिटनमध्येही करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, करोनापासून खबरदारी घेण्यासाठी कडक धोरण स्वीकारलं आहे. त्यामुळे ब्रिटनमधील शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना खोकल्याचं नाटक करण्याबरोबरच करोनावर विनोद करणंही महागात पडणार आहे. अशा विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

शाळा म्हटलं की गमतीजमती आल्याच. वर्गातील दंगामस्ती आणि भांडणही. पण, करोनानंतर सुरू होणाऱ्या उघडणाऱ्या शाळांमध्ये आता असं काही चित्र नसेल. याची प्रचिती आता येऊ लागली आहे. करोनाच्या संकटातून बाहेर पडणाऱ्या ब्रिटनमध्ये जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तिथल्या सरकारनं शाळा सुरू करण्याचाही निर्णय घेतला आहे. मात्र, आता शाळांमध्ये पूर्वीसारखं चित्र नसणार आहे.

ब्रिटनमध्ये याची सुरूवात झाली आहे. सरकारनं करोनाच्या धोक्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिगसह इतर नियमांचं पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांमध्येही या सूचना लागू असणार आहे. डेली मेलनं आपल्या वृत्तात आर्क अलेक्झांड्रा अकादमी काढलेल्या आदेशाचा उल्लेख केला आहे.

अकादमीनं म्हटलं आहे की,”मुद्दाम किंवा वाईट हेतूनं खोकलणं वा कुठेही शिंकणे, त्याचबरोबर करोना आजाराविषयी चुकीच्या टिप्पणी किंवा विनोद करणं, इतर व्यक्तीशी चुकीच्या उद्देशानं शारीरिक संपर्क, या सूचनांचं वारंवार उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल,” असं म्हटलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सूचनांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे.