येत्या काही वर्षांमध्ये दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत. ४ जी तंत्रज्ञानासोबतच डेटाचा वाढता वापर, नव्या कंपन्यांचे आगमन, डिजिटल वॉलेट्स आणि स्मार्टफोन्सची वाढती लोकप्रियता यामुळे या क्षेत्रात मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. २०१८ पर्यंत या क्षेत्रात ३० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. असोचेम-केपीएमजीच्या संयुक्त अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

४ जी वाढते जाळे, डेटाचा वाढलेला वापर, ५ जीची सुरु असलेली तयारी, एमटूएमचे नवे तंत्रज्ञान, माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाचा विकास यांच्यामुळे दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या क्षेत्रात २०२१ पर्यंत ८ लाख ७० हजार लोकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत. असोचेम-केपीएमजीने संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, असेदेखील हा अहवाल सांगतो.

सध्या दूरसंचार क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या नव्या तंत्रज्ञानामुळे येत्या काही महिन्यांमध्ये अपुरी पडू लागेल. याशिवाय नवे तंत्रज्ञान हाताळण्यासाठीही या क्षेत्राला कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार आहे. त्यामुळेच येत्या काळात दूरसंचार क्षेत्रात बंपर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. ‘दूरसंचार क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक संधी निर्माण होतील. त्यासाठी कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची गरज असेल. त्यामुळे या क्षेत्राला सिक्युरिटी एक्सपर्ट्स, ऍप्लिकेशन डेव्हलपर्स, सेल्स एक्झीक्युटिव्स, इंफ्रास्ट्रक्चर टेक्निशन, हँडसेट टेक्निशन यांची आवश्यकता भासणार आहे. याशिवाय सध्याच्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वत:ला अपडेट करावे लागले,’ अशी माहिती अहवालात आहे.