News Flash

बंगालमधील १९४३ च्या भीषण दुष्काळास चर्चिल यांची धोरणेच कारणीभूत

भारतीय- अमेरिकी संशोधकांचा निष्कर्ष

बंगालमधील १९४३ च्या दुष्काळाचे ‘दी स्टेटस्मन’मध्ये प्रसिद्ध झालेले छायाचित्र.

भारतीय- अमेरिकी संशोधकांचा निष्कर्ष

स्वातंत्र्यपूर्व काळात १९४३ मध्ये बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळास ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची धोरणे जास्त प्रमाणात कारणीभूत होती, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. याबाबत ‘दी गार्डियन’ वृत्तपत्राने बातमी दिली आहे.

युद्धकालीन परिस्थितीत आखण्यात आलेल्या  धोरणांचा तो परिणाम होता हे हवामान माहितीच्या आधारे तुलना करून प्रथमच सिद्ध करण्यात आले. गांधीनगर येथील आयआयटीच्या संशोधक विमला शर्मा यांच्या मते हा दुष्काळ  पावसाअभावी नव्हता तर, धोरणात्मक चुकांचा परिणाम होता.

भारत व अमेरिकेच्या संशोधकांनी यात १८७३ ते १९४३ या काळात भारतीय उपखंडात पडलेल्या दुष्काळांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. १८९६-९७ या काळात उत्तर भारतात आद्र्रता ११ टक्के कमी होती. त्यामुळे अन्नाचा तुटवडा निर्माण होऊन ५० लाख लोकांचा मृत्यू झाला होता. १९४३ मधील दुष्काळात ३० लाख लोकांचा मृत्यू झाला. १९४१ मध्ये कोलकात्यात रस्त्यावर लोक भुकेने मरून पडल्याची छायाचित्रे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती.

पाऊस जास्त, तरी दुष्काळ

‘जिओफिजिकल रीसर्च लेटर्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार १९४३ मध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्तच होता, तरीही हा दुष्काळ पडला. १९४३ च्या आधीपासून नैसर्गिक दुर्घटना, पिकांवरचे रोग, म्यानमारचे पतन (जो तांदळाचा मोठा स्त्रोत होता, तो जपानच्या ताब्यात गेला) या कारणांनी १९४३ च्या आधीपासूनच बंगालमध्ये अन्नपुरवठा घसरला होता.

चलनवाढ, साठेबाजी

नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी १९८१ मध्ये असा युक्तिवाद  केला होता,की युद्धकाळातील चलनवाढ,  साठेबाजी यामुळे अन्नाच्या किमती त्या वेळी वाढल्या व त्यामुळे गरिबांना अन्न मिळाले नाही.

भारतातून तांदूळ निर्यात

अलीकडच्या अभ्यासानुसार पत्रकार मधुश्री मुखर्जी यांनी असा युक्तिवाद केला आहे, की हा दुष्काळ हा लंडनमध्ये युद्धकाळात चर्चिल सरकारने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम होता. भारतातील स्त्रोतांचा युद्धकाळात अतिरेकी वापर केल्यास दुष्काळ पडेल असा इशारा त्या वेळी मंत्रिमंडळाला देण्यात आला होता. पण ब्रिटिश सरकारने भारतातून इतरत्र तांदळाची निर्यात सुरूच ठेवली, त्यामुळे दुष्काळास पोषक वातावरण निर्माण झाले, असे मुखर्जी यांचे म्हणणे आहे. त्या काळात भारतातून तांदूळ मोठया प्रमाणात बाहेर गेला.

बंगालमध्ये माणसं मेली, बिहारमध्ये जगली

आगामी आक्रमणाला घाबरून ब्रिटिश सरकारने त्या वेळी जपानच्या लष्कराला अन्न स्त्रोत मिळू नयेत म्हणून बंगालच्या किनारी भागात हजारो बोटीतून तांदूळ जप्त केला होता. त्यामुळे बंगालचा अन्नपुरवठाही रोखला गेला. १८७३-७४ मध्ये बिहारमध्येही दुष्काळ पडला होता. त्या वेळी सर रिचर्ड टेम्पल यांच्या स्थानिक प्रशासनाने लगेच अन्नाची आयात सुरू केली व गरिबांना अन्न खरेदी करता यावे यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या. त्या दुष्काळात कुणीच मेले नाही, अशी परिस्थिती होती. टेम्पल यांच्यावर ब्रिटिश सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी मुबलक खर्च केल्याबाबत टीका केली होती. त्यानंतर त्यांनी दक्षिण व पश्चिम भारतातील दुष्काळ निवारणाचा खर्च कमी केल्याने लोक मरण्याचे प्रमाण वाढत गेले होते.

गव्हाची मागणी फेटाळली

१९४२-४३ मध्ये भारताच्या व्हॉइसरॉयने १ दशलक्ष टन गव्हाची तातडीची मागणी केली होती, पण ती विनंती ब्रिटिश सरकारने फेटाळली. चर्चिल यांनी त्या वेळी, हा दुष्काळ उंदराप्रमाणे वाढणाऱ्या भारतीयांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आहे असा आरोप केला होता. जर एवढा अन्नाचा तुटवडा असेल तर महात्मा गांधी जिवंत कसे राहिले,असा सवालही चर्चिल यांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 11:21 pm

Web Title: study says winston churchill policies caused the 1943 bengal famine
Next Stories
1 पॅन कार्ड आधारला जोडण्याची मुदत सरकारने वाढवली
2 मंदिराबाहेर येताच पोलिसाने महिला आणि तिच्या प्रियकराची केली हत्या
3 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना अनाथ, लावारीस बोलताना लाज बाळगा-अजित पवार
Just Now!
X