अलमोराचे उपविभागीय दंडाधिकारी अजय अरोरा हे ३१ जुलै रोजी मंदाकिनी नदीत पडल्यापासून बेपत्ता झाले असून त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचे उत्तराखंड सरकारचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने त्यांचा शोध घेणाऱ्यास कुटुंबीयांनी दोन लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.
अरोरा बेपत्ता झाल्याला आता एक आठवडा उलटून गेला असून त्यांचा ठावठिकाणा शोधण्यास राज्य सरकारला अपयश आल्याने इनाम जाहीर करणे आम्हाला भाग पडले, असे अरोरा यांचे वडील कृष्ण लाल यांनी सांगितले.
केदारनाथ मंदिराला भेट देऊन गरुरचट्टी येथील छावणीत परतत असताना एका तात्पुरत्या स्वरूपाच्या पुलावरून पाय घसरून ते मंदाकिनी नदीत पडले. प्रशिक्षित पथकातील १४ जणांनी त्यांचा गौरीकुंड, रामवाडा आणि फाटा येथे कसून शोध घेतला. मात्र पथकाला यश आले नाही.
अरोरा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. तरीही त्यांना केदारनाथ येथे पाठविण्यात आले, असा आरोप त्यांच्या पत्नी मोना यांनी केला आहे. डेहराडूनमधील डॉक्टरांनी आपल्याला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे, असे अरोरा यांनी आपल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगितले होते. तरीही त्यांना तेथे पाठविण्यात आले, असे मोना म्हणाल्या.