नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानमधून भारत सरकारने परत आणाव्यात, असे आवाहन त्यांच्या कन्या अनिता बोस-पाफ यांनी केले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तैवान येथे १८ ऑगस्ट १९४५ रोजी मृत्यू  झाला होता. त्यांच्या अस्थी टोकियोतील रेणकोजी मंदिरात सप्टेंबर १९४५ पासून पडून आहेत. अनिता बोस म्हणाल्या, की नेताजींच्या ७३ व्या स्मृतिदिनी मी त्यांच्या अस्थी भारतात आणण्याचे आवाहन पुन्हा एकदा करीत आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वतंत्र भारतात परत येण्याची इच्छा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे किमान त्यांच्या अस्थी तरी स्वतंत्र भारतात आणाव्यात. माझे वडील हे हिंदू होते, त्यामुळे परंपरेनुसार त्यांच्या अस्थींचे विसर्जन गंगेत करणे आवश्यक आहे. हिरोजी हिराबायाशी हे टोकियोतील जपान भारत असोसिएशनचे अध्यक्ष असून त्यांनी नेताजींच्या अस्थी भारतात नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

हिराबायाशी हे जपानचे भारतातील माजी राजदूत असून त्यांनी सांगितले, की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी टोकियोतील रेणकोजी मंदिरात ठेवलेल्या असून त्याबाबत भारताकडून अधिकृत विनंतीची गरज आहे. रेणकोजी मंदिरात काल नेताजींना श्रद्धांजली वाहण्यात आली. नेताजी तैपेईतील विमान अपघातात मरण पावले व नंतर त्यांच्या अस्थी टोकियोत आणण्यात आल्या. त्याचे काही पुरावे आशिष राय यांच्या अलिकडील पुस्तकात आले आहेत.

‘लेड टू रेस्ट-द  कन्ट्रोव्हर्सी ओव्हर सुभाष चंद्र बोस डेथ’ या रोली बुक्सने प्रसिद्ध केलेल्या अनिता बोस यांच्या पुस्तकात म्हटले आहे, की १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या अवशेषांच्या ज्या डीएनए चाचण्या  केल्या तर त्यातून सर्व काही स्पष्ट होईल. १९७९ मध्ये नेताजी ज्या विमान अपघातात मृत्यू पावले, त्यात वाचलेल्या एका व्यक्तीची मुलाखत प्रा. लिओनार्ड गॉर्डन यांनी टोकियोत घेतली होती, तेव्हा मी उपस्थित होते. त्यातून नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे स्पष्ट झाले, असे अनिता बोस यांनी म्हटले आहे.