08 March 2021

News Flash

सरसंघचालक चुकू शकतात!

मेळाव्याला दोन हजार ‘स्वयंसेवक’

गोव्यातील संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी रविवारी बाम्बोलिम येथे मेळाव्याद्वारे शक्तिप्रदर्शन केले.

शक्तिप्रदर्शनात सुभाष वेलिंगकर यांचे वक्तव्य; मेळाव्याला दोन हजार स्वयंसेवक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी रविवारी घेतलेल्या बैठकीला २००० कार्यकर्ते उपस्थित होते. वेलिंगकर यांनी स्वतंत्र गोवा प्रांत निर्माण करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले. काही नेते आमच्यावर निर्णय लादू पाहात होते. मात्र आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही स्वयंसेवक राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सरसंघचालक चुकू शकतात, मात्र संघ नाही, असे सांगत त्यांनी संघाच्या एकाही स्वयंसेवकाला भाजपचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पाठिंबा देण्याच्या निर्णय मान्य नाही, असा दावा केला. दरम्यान संघाने शनिवारीच लक्ष्मण बेहरे यांची गोवा विभाग संघचालक म्हणून नियुक्ती केली होती. बेहरे हे निष्ठावान स्वयंसेवक आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यात आम्हाला अडचण नाही, असा सूर वेलिंगकर यांनी आळवला. संघ ही व्यक्तीवर नव्हे तर विचारांवर चालणारी संघटना आहे. भगव्या ध्वजाला आम्ही गुरू मानतो, कोणा व्यक्तीला नाही, हे सांगतानाच, संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या एका वक्तव्याचा दाखला दिला.

हेडगेवार यांनी बाल स्वयंसेवकांशी बोलताना एक वेळ सरसंघचालक चुकतील, मात्र संघ नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे विचारसरणी ही आमच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक राहील, असे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनादरम्यान काही नेत्यांनी आमच्यावर मते लादण्याचा प्रयत्न केला. ते आम्हाला मान्य नाही, त्यामुळेच आम्ही समांतर व्यवस्था निर्माण केली, असे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.

वेलिंगकरांच्या निवासस्थानी पर्रिकर

गोव्यात भाषेवरून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या सुभाष वेलिंगकर यांच्या निवासस्थानी जाऊन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नुकतेच गणरायाचे दर्शन घेतले. पर्रिकर जेव्हा माझ्या घरी आले तेव्हा वातावरण वेगळे होते. त्यात राजकारण नव्हते. पर्रिकर लहान असल्यापासून त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत, असे सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले. भाषेवरून सुरू असलेल्या वादाची काहीच चर्चा झाली नाही, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गोवा संघचालक पदावरून वेलिंगकर यांना मुक्त केल्यावर त्यांनी पर्रिकर यांच्यावर संघनेतृत्वाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 12:56 am

Web Title: subhash velingkar holds maiden meeting of rss goa pradesh
Next Stories
1 भारतीय वंशाच्या चार प्रमुख उद्योजकांचा अमेरिकेत गौरव
2 वैध अण्वस्त्रसज्ज राष्ट्र म्हणून मान्यतेची उ. कोरियाची मागणी
3 गृहमंत्र्यांकडून काश्मीर खोऱ्यातील ‘आदर्शवादी’ वानीचे कौतूक
Just Now!
X