आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीतील युद्धसामग्रीने पेट घेतल्यामुळेच त्यामध्ये स्फोट झाल्याची शक्यता असल्याचे प्राथमिक तपासातून आढळल्याचे संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशाकडील सर्वच पाणबुड्यांमधील युद्धसामग्रीच्या सुरक्षेविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आणि सुरक्षेबाबत पुरेशी खबरदारी घेण्याचे आदेश नौदलाने दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नौदलाच्या ताफ्यातील सिंधुरक्षक पाणबुडीला गेल्या मंगळवारी रात्री मुंबईतील डॉकयार्डवर भीषण आग लागली होती. आगीमुळे या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. घटना घडली त्यावेळी पाणबुडीमध्ये तीन अधिकाऱयांसह १८ नौसैनिक कार्यरत होते. आगीची तीव्रता आणि त्यामुळे पाणबुडीला झालेले नुकसान बघता १८ जणांपैकी कोणीही जिवंत असण्याची शक्यता खूप धूसर असल्याचेही ऍंटनी यांनी सभागृहात स्पष्ट केले. पाणबुडीतील युद्धसामग्रीने कशामुळे पेट घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही ऍंटनी यांनी सभागृहाला सांगितले.