वेगवेगळ्या मुद्यांवर भूमिका मांडणारे भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आपल्याच पक्षाच्या आयटी सेलवर भडकले आहेत. स्वामी यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला. भाजपाची आयटी सेल बनावट खाती तयार करून आपल्यावर हल्ले करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी यासंदर्भात पक्षाकडे एक मागणीही केली आहे.

भाजपाच्या आयटी सेलबद्दल पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून तक्रार केली आहे. स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, “भाजपाच्या आयटी सेल कामातून गेली बेकार झाली आहे. काही सदस्य बनावट आयडीचा वापर करून माझ्यावर हल्ले करत आहेत. मग माझ्या संतप्त समर्थकांनी उत्तर देण्यास सुरूवात केली, तर मी त्याला जबाबदार असणार नाही. ज्याप्रमाणे माझ्यावर होत असलेल्या हल्ल्यांना भाजपाला जबाबदार ठरवता येणार नाही,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

स्वामी यांच्या ट्विटवर एका समर्थकांनं ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन केलं. “आपण टीकेपेक्षा वरचढ आहात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपण त्यांना महत्त्व देत असाल, तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात,” असं म्हटलं आहे.

त्यावर बोलता स्वामी म्हणाले,”मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करतोय, पण भाजपानं त्यांची हकालपट्टी करावी. एक मालवीय नावाचं पात्र आहे, घाणेरडा दंगा करत आहे. आपला पक्ष मर्यादा पुरूषोत्तम रामाचा पक्ष आहे, रावण किंवा दुःशासनाचा नाही,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

सुब्रमण्य स्वामी हे भाजपाचे असे खासदार आहेत, जे पक्षाच्या विरोधातही भूमिका मांडतांना दिसतात. मात्र, यावेळी स्वामी यांनी पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधातच बंड पुकारलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी मालवीय यांची हकालपट्टी करण्याची मागणीही पक्षाकडे केली आहे.