आपल्या वादग्रस्त वक्तव्याने सतत चर्चेत असलेले भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा स्वपक्षावरच टीका केली आहे. जम्मू काश्मीरमधील भाजप-पीडीपी युती ही पहिल्या दिवसापासून अपयशी ठरत आहे. या युतीचा शेवट निश्चित आहे, त्यामुळे येथे राष्ट्रपती राजवटीची आवश्यकता असून मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. मेहबूबा मुफ्ती या कधीच सुधारणार नाहीत. त्या सुधरतील या आशेने भाजपने त्यांच्याशी युती केली होती. दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांनी राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. याबाबत मी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली होती. मेहबूबा या आपल्याला सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण मी राजनाथ यांच्या आधीपासून मेहबूबा यांना ओळखतो. त्या बदलणार नाहीत.
जम्मू काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी युती होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रयत्न केले होते. याची जबाबदारी राम माधव यांच्याकडे देण्यात आली होती. मेहबूबा यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप स्वामी यांनी यापूर्वी केला होता.
यापूर्वीही सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारसमोरील अडचणीत वाढ केलेली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावरही टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) बाबत शंका उपस्थित केली होती.