पद्म पुरस्कराच्या मानकऱ्यांच्या निवडीवरून सरकारवर निशाणा साधणाऱ्या काँग्रेसवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी घणाघाती हल्ला चढवला. यावेळी स्वामी यांनी जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना गद्दार म्हणून संबोधले. तसेच अमर्त्य सेन यांना काँग्रेसच्या काळात देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारावर बोट ठेवले.

गेल्या आठवड्यात सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही व्यक्तींचा समावेश होता. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी संघाचा प्रचार करणाऱ्यांना मोदी सरकारने पद्म पुरस्कार बहाल केल्याची टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना स्वामी यांनी म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे कार्यकर्ते हेदेखील भारताचे नागरिक आहेत. त्यांनी देशकार्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतली आहे. मात्र, त्यांच्या कामगिरीचे योग्यप्रकारे कौतुक झाले नव्हते. बहुधा संघाचे स्वयंसेवक कोणत्याही अपेक्षेशिवाय समाजकार्य करत असतील.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) काळात तर अर्मत्य सेन यांच्यासारख्या गद्दाराला पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी नालंदा विद्यापीठाची लूट करण्याशिवाय देशासाठी काय केले आहे? ते केवळ डाव्या विचारसरणीचे असल्यामुळे माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांना भारतरत्न देण्यासाठी सरकारवर दबाव टाकला, असे स्वामी यांनी म्हटले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपामध्ये लोकप्रियच मात्र पक्षात इतरांचे स्थान काय?’

केंद्र सरकारकडून गुरुवारी पद्म पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे घोषित करण्यात आली. यंदा देशभरातील ८५ जणांना विविध पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. (यामध्ये विभागून दिलेल्या दोन पुरस्कारांचा समावेश) पद्म पुरस्कारांमध्ये ३ जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण आणि ७३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये १४ महिलांचा तर १६ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. ३ जणांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मार्च-एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

आध्यात्मिक गुरु सिद्धेश्वर स्वामींनी नाकारला ‘पद्मश्री’; पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

मात्र, यापैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते वेदप्रकाश नंदा आणि केरळातील संघाचे मुख्य प्रचारक पी.परमेश्वर यांच्या निवडीवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. वेदप्रकाश नंदा यांनी अनिवासी भारतीयांमध्ये संघप्रणित विचार आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार केला. तर पी. परमेश्वरन यांनी केरळात भाजपाला हातपाय रोवण्यास मदत केली, असे रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.