आपल्याला सीमेपलीकडील दहशतवाद संपवायचा असेल तर दाउद इब्राहिम आणि हाफिज सईद ज्या भागात राहतात त्या भागात भारताने थेट हल्ला करावा असे मत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडले. पाकिस्तानच्या अणुयुद्धाच्या पोकळ धमक्यांना देखील घाबरण्याची काही गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी स्वामी यांनी केली. बडोदा येथे भारत विकास परिषदेनी आयोजित केलेल्या भारत आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद या विषयावर बोलताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

पाकिस्तानची विभागणी बलुचिस्तान, पख्तुनीस्तान आणि सिंध मध्ये करुन त्यांचे विघटन करायला हवे असे त्यांनी म्हटले. दहशतवाद आटोक्यात आणायचा असेल तर हाफिज सईद आणि दाउद इब्राहिम ज्या ठिकाणी लपून बसले आहेत त्या ठिकाणी आपण हल्ले करावेत असे स्वामी यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि चीनची मदत घेण्यासही भारताने मागेपुढे पाहू नये असे त्यांनी म्हटले.  पाकिस्तानने माजी नौदल अधिकारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर भारताने बलुचिस्तानला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली पाहिजे असे मत त्यांनी याआधी व्यक्त केले होते. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने गुप्तहेर ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर भारतात त्याविरोधात मोठे पडसाद उमटत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी पाकिस्तानचा निषेध केला होता.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पाकिस्तानने दावा केला आहे की, जाधव हे बलुचिस्तानमध्ये अडचणी निर्माण करत आहेत. त्यामुळेच त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण जर जाधव यांना काही झाले तर पाकिस्तानला घाबरवण्याची गरज आहे. आम्ही बलुचिस्तानला स्वतंत्र देश समजू आणि बलूच प्रतिनिधींना भारतात बोलवू. त्यांना सरकार स्थापन करण्यास सांगू, असे ते म्हणाले होते. दरम्यान, मार्च महिन्यात पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातून कुलभूषण जाधव यांना पाकमधील सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती. मूळचे मुंबईचे असलेले कुलभूषण जाधव हे नौदलातील माजी अधिकारी आहेत. मुदतीपूर्वीच त्यांनी निवृत्ती स्वीकारली होती. निवृत्तीनंतर त्यांनी जहाजाने मालवाहतूक करण्याचा व्यवसाय सुरू केला होता.