एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी भ्रष्टाचार केला होता असा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तसेच कार्ती चिदंबरम यांचे विदेशी बॅंकांमध्ये २१ खाती आहेत असे त्यांनी म्हटले. कार्ती यांच्यावर टीका करताना स्वामी यांनी अर्थ मंत्रालयावर, आयकर विभागावर, सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालयावर टीका केली आहे. पुरेसे पुरावे असून देखील या संस्था कार्ती चिदंबरम यांच्यावर कारवाई करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे आरोप केले आहेत.

आयकर विभागावर, सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालय हे सर्व विभाग कार्ती चिदंबरम यांच्याविरोधातील तपासामध्ये दिरंगाई करत आहेत. तसेच त्यांच्यावर आवश्यक कारवाई करण्यास ते असमर्थ ठरले आहेत असे ते म्हणाले.  कार्ती चिदंबरम यांच्या नावे २१ अघोषित बॅंक खाती आहेत. त्यांच्याविरोधात सीबीआय आणि ईडीने कारवाई करणे अपेक्षित आहे पंरतु ते काही करत नसल्याचे त्यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर कार्ती चिदंबरम यांनी ईडीने समन्स बजावले होते त्याला त्यांनी उत्तर दिले नाही. अर्थ मंत्रालयामध्ये पी. चिदंबरम यांचे मित्र आहेत. त्यांच्या सांगण्यावरुनच ही कारवाई झाली नाही असे स्वामी यांनी म्हटले.  कार्ती चिदंबरम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असून माझ्याजवळ सर्व व्यवहारांचा तपशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बार्कले (मोनॅको), मेट्रो बॅंक (इंग्लंड), स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक (सिंगापूर), सिंगापू ओसीबीसी, एचएसबीसी (इंग्लंड), युबीएस (स्वीत्झर्लँड), वेल्स फारगो बॅंक (अमेरिका) अशा विविध बॅंकांमध्ये कार्ती यांची खाती आहेत असे स्वामी म्हणाले. या सर्व खात्यांची माहिती आयकर विभागाकडे आहे परंतु त्यांनी काही कारवाई केली नाही असे त्यांनी म्हटले. पी. चिदंबरम हे जेव्हा अर्थ मंत्री होते तेव्हा त्यांचे अनेक मित्र या खात्यामध्ये झाले होते. त्यांच्या आदेशामुळेच कारवाई झाली नाही असे ते म्हणाले. अर्थ मंत्रालयाने पूर्णपणे सहकार्य न केल्यामुळेच पंतप्रधानांनी केलेल्या नोटाबंदीचे परिणाम दिसले नाही असे ते म्हणाले आणि त्याच अधिकाऱ्यांमुळे कार्तीवर कारवाई होत नसल्याचे ते म्हणाले.