अयोध्येत राममंदिर बांधण्यासारख्या आश्वासनांच्या अंमलबजावणीसाठी ‘कारवाईयोग्य’ कार्यक्रम तयार करण्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
अयोध्येत राममंदिराचे बांधकाम, काश्मीरमध्ये घटनेचे ३७०वे कलम रद्द करणे आणि गोहत्येवर देशव्यापी बंदी अशी आश्वासने भाजपने २०१४ सालच्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यात दिली होती. त्याचे काय याबाबत लोकांना उत्सुकता आहे असे स्वामी यांनी पक्षाध्यक्ष अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.  देशाच्या धर्म, संस्कृती, इतिहास आणि वारसा याबाबत ‘नवजागरण’ करण्याच्या दृष्टीने भाजपशासित राज्यातील सरकारांनी बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या वरील मुद्दय़ांवर तोडगा काढावा, असे या पत्रात म्हटले आहे. रामजन्मभूमीवर राममंदिर बांधण्याकरता हिंदू व मुस्लीम वाटाघाटींद्वारे तोडगा काढू शकतात. पाडलेल्या बाबरी मशिदीऐवजी शरयू नदीपलीकडे मुस्लिमांसाठी नवी मशीद बांधून देण्यास हिंदू तयार होऊ शकतात असे स्वामी यांनी म्हटले आहे.