करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केले. भरपाईपोटी राज्यांना रिझव्‍‌र्ह बँकेकडून किफायतशीर व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे दोन पर्याय केंद्राने दिले.मात्र या बैठकीमध्ये निर्मला यांनी ‘देवाची करणी’ म्हणजेच Act of God चा उल्लेख केल्यानंतर हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. आता याच मुद्द्यावरुन भाजपाचे खासदार भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याबरोबर केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. ट्विटवरुन यासंदर्भात व्यक्त होताना स्वामी यांनी करोनापूर्वी अर्थव्यवस्थेला जी घरघर लागली ती पण देवाचीच करणी होती का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> मोदी सरकारसमोर अर्थसंकट गडद; GDP च्या तुलनेत सरकारी कर्जाचा आकडा ९१ टक्क्यांवर जाणार

“मला समजलंय की अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बैठकीमध्ये करोना १९ ही देवाची करणी असल्याचं म्हटलं. मी याबद्दल व्हिडिओ पोस्ट करेनच. मात्र २०१५ च्या आर्थिक वर्षात ८ टक्क्यावर असणारा जीडीपीमध्ये झालेली वार्षिक घट आणि आज (२०२० च्या पहिल्या तिमाहीमध्ये) तो ३.१ पर्यंत खाली येणं ही सुद्धा देवाची करणी आहे का?”, असा थेट सवाल स्वामी यांनी उपस्थित केला आहे.

जाणून घ्या >> GDP म्हणजे नेमकं काय? तो कसा मोजतात?, त्याचा सामान्यांशी कसा संबंध असतो?

याचबरोबर स्वामी यांनी काही व्हिडिओही ट्विट केले आहेत. हे व्हिडिओ काल पार पडलेल्या जीएसटी परिषदेतील आहेत. स्वामी हे कायमच त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. मागील अनेक महिन्यांपासून त्यांनी काही विषयांवर थेट केंद्र सरकारला प्रश्न विचारल्याचे पहायला मिळालं आहे. सध्या केंद्र सरकार नीट आणि जेईई परीक्षा घेण्यासंदर्भातील निर्णयाच्या बाजूने असतानाचा स्वामी यांनी मात्र या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

नक्की वाचा >> ‘देवाच्या करणी’मुळे केंद्र हतबल… ‘मोदी विष्णूचा ११ वा अवतार’; महाराष्ट्रातील नेत्याचं ‘ते’ ट्विट व्हायरल

काय म्हणाल्या सीतारमान?

गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्यांचे उत्पन्न घटले असून त्यांनी केंद्राकडे जीएसटीच्या नुकसानभरपाईचा धोशा लावला आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांची १.५ लाख कोटींची नुकसानभरपाई केंद्राने दिलेली नाही. राज्यांना दिल्या जाणाऱ्या जीएसटी नुकसानभरपाईचा प्रश्न सोडवण्यासाठी गुरुवारी सलग पाच तास जीएसटी परिषदेत चर्चा झाली. या बैठकीमध्ये सीतारामन यांनी देशावर आलेले करोना संकट हे  ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असं म्हटलं. म्हणजेच देशातील आर्थिक परिस्थितीसाठी कोणालाही थेट जबाबदार धरता येणार नसून निसर्गनिर्मिती गोष्टींमुळे हे आर्थिक संकट ओढावल्याचे निर्मला यांना सुचित करायचं होतं.

नक्की वाचा >> Act of God म्हणजे काय?, GST परिषदेनंतर सारा देश शोधतोय अर्थ, महाराष्ट्र यादीत अव्वल