गुंतवणूकदारांची सुमारे २० हजार कोटींची देणी गुंतवणूकदारांना कशी परत करणार हे जोपर्यंत स्पष्ट केले जात नाही, तोपर्यंत सहारा समुदायाचे प्रमुख सुब्रतो राय यांना देश सोडून जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. न्या. के. एस. राधाकृष्णन् आणि न्या. जे. एस. शेखर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
सुमारे २२ हजार ८८५ कोटी रुपयांची देणी आपण गुंतवणूकदारांना परत केली आहेत, असा दावा सहारा समुदायातर्फे करण्यात येतो. मात्र हा समूह याबद्दलचा तपशील स्पष्ट करणारी कागदपत्रे दाखवू शकलेला नाही. जोपर्यंत ही कागदपत्रे दाखविली जात नाहीत, तोपर्यंत राय यांना भारताबाहेर जाता येणार नाही, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, आपले आर्थिक स्रोत स्पष्ट करण्यात कंपनीला जर अपयश आले तर, उलट अधिक सखोल चौकशीचा आदेश देण्यास न्यायालय मागेपुढे पाहणार नाही, असेही खंडपीठाने बजावले. व्यावसायिक कामाच्या निमित्ताने आपल्या अशिलाला परदेशी जायचे आहे, त्याला जाण्यास परवानगी मिळावी. पुढील सुनावणीच्या आधी ते भारतात परततील अशी मागणी सुब्रतो राय यांच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.