News Flash

तिहारमध्ये सुब्रतो रॉयसाठी एसी, वाय-फाय, व्हिडिओ कॉन्फरंसिंग… बिल १.२३ कोटी

सुब्रतो रॉय यांनी तिहार तुरुंगात छोटेखानी ऑफिस थाटले होते.

गुंतवणुकदारांचे २४ हजार कोटी रुपये परत न केल्याच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेले सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी तिहार तुरुंग प्रशासनाला १.२३ कोटी रुपये चुकते केले. वर्षभर त्यांनी तिहार तुरुंगात छोटेखानी ऑफिस थाटले होते. तुरुंगात त्यांना वातानुकूलीत खोली, वाय-फाय, व्हिडीओ कॉन्फरंसिंग सुविधा, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि स्टेनोग्रॉफरसारख्या सुविधा प्रदान करण्यात आल्या होत्या. या सर्व सुविधांसाठी त्यांनी ही रक्कम चुकती केली. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सुब्रतो रॉय यांना आपली मालमत्ता विकणे गरजेचे होते. यासाठी त्यांना आपल्या समुहाचे अधिकारी आणि ग्राहकांसमवेत संपर्क करणे जरुरीचे होते. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाची दखल घेत न्यायालयाने रॉय यांना तिहार तुरुंगातच एक खास जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश तुरुंग प्रशासनाला दिले होते. सुब्रतो रॉय यांना देण्यात आलेली ही खास सवलत १२ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली. ऑगस्ट महिन्यात १० दिवसांसाठी पहिल्यांदा त्यांनी तिहारमधील या खास जागेचा वापर केल्याचे समजते.

याठिकाणीच त्यांनी न्यूयॉर्क आणि लंडनमधील आपल्या दोन आलिशान हॉटेलांच्या विक्रीसंदर्भातील बैठका घेतल्या होत्या. या दहा दिवसांमध्ये वाय-फाय आणि व्हिडीओ कॉन्फरंसिंगसारख्या सुविधा वापरण्याची परवानगी न्यायालयाने त्यांना दिली होती. यादरम्यान त्यांनी गुंतवणुकदार आणि आपल्या दोन मुलांशीदेखील संपर्क साधला. गुंतवणूकदारांचे २४ हजार कोटी रुपये परत न केल्याच्या आरोपाखाली १४ मार्च २०१४ पासून सुब्रतो रॉय तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये पहिल्यांदा सहारा समुहाला गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. सेबी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरदेखील सहारा समुहाने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना न्यायालयात हजर राहाण्यास सांगितले, त्यासदेखील त्यांनी टाळाटाळ केली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत लखनऊ पोलिसानी सुब्रतो रॉयना दिल्लीत आणून न्यायालयासमोर सादर केले. यावेळी न्यायालयाकडून त्यांना दहा हजार कोटी रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु, ते त्याची पूर्तता करू शकले नाहीत, ज्यानंतर त्याना जामीन मिळाला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 3:41 pm

Web Title: subrata roy pays rs 1 23 crore for special facilities in tihar jail
टॅग : Subrata Roy
Next Stories
1 चीनसह पाकिस्तानचेदेखील भारताला कडवे सागरी आव्हान, जाणून घ्या भारत काय करणार
2 इंग्रजी शिक्षण राष्ट्रभक्ती शिकवू शकत नाही- सरसंघचालक
3 काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात चार जवान जखमी
Just Now!
X