गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याने गोत्यात आलेले सुब्रतो रॉय यांच्या सहारा समुहाची संपत्ती विकत घेण्यासाठी देशातील बडे उद्योजक इच्छुक आहेत. टाटा, गोदरेज, अदानींपासून ते पतंजलीनेही सहारा यांची संपत्ती विकत घेण्यात रस दाखवला आहे. सहारा समुहाच्या ७,४०० कोटी रुपयांच्या ३० मालमत्ता विकत घेण्यात या कंपन्यांनी रस दाखवला आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे बुडवणारे सुब्रतो रॉय हे अडचणीत आले आहेत. सुप्रीम कोर्टाने सुब्रतो रॉय यांना तातडीने सेबीकडे पैसे भरण्याचे आदेश दिले आहेत. सहारा समुहाच्या संपत्तीचा लिलाव होणार असून लिलाव प्रक्रिया नाईट फ्रँक इंडिया या कंपनीमार्फत पार पडत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहारा समुहाची मालमत्ता विकत घेण्यात ओमेक्स, एल्डेको तसेच इंडियन ऑईल अशा विविध कंपन्यांनी रस दाखवला आहे. लखनौमधील सहारा रुग्णालय विकत घेण्यासाठी चेन्नईतील अपोलो रुग्णालय इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले. लिलाव प्रक्रियेत योग्य तो भाव मिळेल का यावरही आता शंका उपस्थित होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुब्रतो रॉय यांना तातडीने पैसे भरायचे आहेत. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत फार वेळ घालवता येणार नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. लिलाव प्रक्रियेतील मालमत्तेचे दर हे जास्त आहेत. त्यामुळे इच्छुक खरेदीदार २ ते ३ महिन्याचा अवधी मागत असल्याचे समजते.

गोदरेज, पतंजली, टाटा असे मोठे उद्योग समुहदेखील या लिलाव प्रक्रियेत सहभागी होतील अशी चर्चा आहे. गोदरेज प्रॉपर्टीजच्या अधिकाऱ्यांनी लिलावप्रक्रियेत सहभागी होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नाईट फ्रँक कंपनीकडून आयोजित लिलाव प्रक्रियेत आम्ही सहभागी होऊ असे गोदरेज प्रॉपर्टीजच्या संचालकांनी सांगितले. सहारा समुहाच्या पुण्यातील मालमत्तेसाठी गोदरेज समुह बोली लावणार असे समजते. पतंजली, टाटा या कंपन्यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही.