गेल्या वर्षभरापासून दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेल्या सहाराश्री सुब्रतो रॉय यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अटींवर जामीन मंजूर केला. रोख स्वरुपात पाच हजार कोटी रुपये आणि तितक्याच रकमेची बॅंक हमी दिल्यानंतर त्यांना जामीनावर तुरुंगातून सोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्याचबरोबर पुढील १८ महिन्यांमध्ये टप्प्याटप्याने सहारा समुहाने ३६ हजार कोटी रुपये सेबीला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशांचे पालन केले नाही, तर सुब्रतो रॉय यांना पुन्हा पोलीसांपुढे शरण यावे लागणार आहे.
सुब्रतो रॉय यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, याचबरोबर देशात कुठे जाणार आहात, त्याची सर्व माहिती सुब्रतो रॉय यांनी दिल्ली पोलीसांना देण्याचे बंधनही न्यायालयाने त्यांच्यावर घातले आहे. दर पंधरा दिवसांनी त्यांना नवी दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. न्यायालयातून सुटका होत नाही, तोपर्यंत पुढील आठ आठवडे तिहार तुरुंगामध्ये सुब्रतो रॉय यांना दूरध्वनी आणि कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणात रॉय वर्षभरापासून नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत.