कोलकाता : सुधारित नागरिकत्व कायदा संसदेने मंजूर केल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित मायदेशी परत जाण्याचे प्रमाण वाढले आहे,असे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे.

सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक वाय.बी खुराणिया यांनी सांगितले, की गेल्या महिन्यात अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडण्यात आले होते.उत्तर  २४ परगणा जिल्ह्य़ातून मायदेशी जाणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांची संख्या अधिक आहे. हा जिल्हा  बांगला देश सीमेला लागून आहे.  गेल्या महिनाभरात स्थलांतरित बांगलादेशात परत जाण्याचे प्रमाण वाढले असून जानेवारी महिन्यात २६८ बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित परत गेले आहेत. जे परत जात आहेत त्यात काही गवंडी, घरकाम करणारे आहेत. उत्र्त  २४ परगणा येथून सर्वाधिक स्थलांतरित परत गेले असून ते आधी बंगळुरू व उत्तर भारतात छोटी मोठी कामे करीत होते. २०१९ मध्ये सीमा सुरक्षा दलाने २१९४ घुसखोरांना सीमा ओलांडताना अटक केली होती. गेल्यावर्षी डिसेंबरपासून परिस्थिती बदलली आहे.

पश्चिम बंगाल व बांगलादेश यांच्यात २२१६.७ कि.मीची संयुक्त सीमा असून बऱ्याच भागात कुंपण नाही. सध्या बांगलादेशी स्थलांतरित परत जात असून त्यांच्याकडे काही तस्करीच्या वस्तू असतील तरच अडवले जाते अन्यथा त्यांना त्यांची माहिती घेऊन  मायदेशी जाऊ दिले जाते.