करोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी औषध व लस शोधण्याचे प्रयत्न सुरू असून हैदराबाद विद्यापीठातील महिला संशोधिकेने या विषाणूवर परिणामकारक ठरू शकेल अशी प्रायोगिक  लशीचे संभाव्य घटक शोधून काढले आहेत.

या लशीवर अजून प्रयोग सुरू व्हायचे आहेत. सार्स व एमईआरएस (सिव्हीयर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम व मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) या रोगांवरही ही लस परिणामकारक ठरू शकते. हैदराबाद विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसच्या जैवरसायन विभागात काम करणाऱ्या डॉ. सीमा मिश्रा यांनी नवीन लशीचे प्रारूप तयार केले आहे. त्यांनी ‘टी सेल एपिटोप्स’ ही प्रायोगिक लस तयार केली असून त्या लशीच्या मदतीने कोविड १९ म्हणजेच करोना विषाणूला मारणे शक्य होणार आहे.

सध्या तरी करोना संसर्गावर सामाजिक अंतर राखणे हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. सीमा मिश्रा यांनी त्यांचे संशोधन जागतिक पातळीवर मांडले आहे. करोना विषाणूच्या काटय़ांवर मेदाचे आवरण असते, करोना विषाणूची रचना इतर करोना  विषाणूंपेक्षा काही प्रमाणात वेगळी आहे असली तरी अनेक साम्येही आहेत.

संशोधनात काय?

डॉ. मिश्रा यांच्या मते या  लशीवर अजून निर्णायक पुरावे मिळण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. लशीचे हे घटक म्हणजे पेप्टाइड असून त्यांच्या मदतीने करोना विषाणूला प्रतिकार केला जात असतो. त्यांच्या मदतीने प्रतिकारशक्ती प्रणालीला संदेश जात असतात. ‘प्रतिकारशक्ती माहितीशास्त्रा’चा आधार घेत संगणनात्मक आज्ञावलीचा आधार घेतला तर लस कमी काळात शोधून काढणे शक्य आहे. विषाणूला प्रतिकार करणाऱ्या एपिटोप्सचा शोध घेण्यात आला असून त्याचा वापर लस तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे एपिटोप्स म्हणजे विषाणूला विरोध करणारे प्रतिपिंड असतात. लस तयार करण्यासाटी खरेतर १०-१५ वर्षे लागू शकतात पण संगणनात्मक मार्गाचा वापर केला तर १० दिवसातही प्रायोगिक लस तयार करता येते. डॉ. सीमा वर्मा यांनी करोना विषाणूला मारणारे संभाव्य घटक शोधून काढले असून त्याआधारे लस तयार करता येईल. मानवी प्रथिनांची हानी न करता विषाणूच्या प्रथिनांचा बिमोड करणारी लस एपिटोप्सच्या मदतीने तयार करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.