भारत आणि चीन लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान झालेल्या चर्चेच्या १२ व्या फेरीनंतर दोन्ही देशाचे सैनिक पूर्व लडाखच्या गोग्रामधून मागे हटले आहेत. भारतीय लष्कराने याबाबतची माहिती शुक्रवारी दिली. पीपी१७ए नावाने ओळखल्या जाणाऱ्या पोस्टवर दोन्ही देशाचे सैनिक आमनेसामने उभे ठाकले होते. कॉर्प्स कमांडर यांच्या पत्रकार परिषदेनंतर ४ आणि ५ ऑगस्टला दोन्ही देशाचे सैनिक मागे हटले आहेत. पीपी१७ए वर गेल्या आठवड्यात लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. लडाखमध्ये गेल्या १५ महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

“पूर्वोत्तर लडाखमधील गोग्रा पॉईंटवरून भारत-चीन सैनिक मागे हटले आहेत. ४ आणि ५ ऑगस्टला ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही देशाचे सैनिक कायमस्वरुपी बेस कॅम्पमध्ये परतले आहेत”, असं भारतीय लष्कराने सांगितलं आहे. दोन्ही बाजूंच्या परिसरात निर्माण केलेली सर्व तात्पुरती बांधकामं आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्यात आल्याचे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे. पूर्व लडाखमधील सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास चार महिन्यानंतर पुन्हा एकदा बैठक झाली होती.

चीनची घुसखोरी

मे २०२० मध्ये घुसखोरी केल्यापासून पीएलएने दक्षिण गलवानमधील गोग्रा व हॉट स्प्रिंग क्षेत्रातून माघार घेण्यास नकार दिला होता. पीपी १७ ए बिंदूजवळ भारतीय हद्दीत अर्धा किलोमीटर आतपर्यंत चीनने घुसखोरी केली होती.