नवी दिल्ली: पाच राज्यांबरोबरच विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये बहुतेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांनाच यश मिळाले आहे. कर्नाटकमधील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघात भाजपने, तर मस्की मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला. गुजरातमधील मोरव्हा हडप मतदारसंघात भाजपने यश मिळवले. त्यामुळे १८२ सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपची सदस्य संख्या ११२ इतकी झाली आहे. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ६५ सदस्य आहेत. तेलंगणमधील नागार्जुन सागर मतदारसंघ राखण्यात सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समितीला यश आले. तेलंगण राष्ट्र समितीच्या नोमुला भगत यांनी काँग्रेसच्या के. जना रेड्डी यांचा जवळपास १९ हजार मतांनी पराभव केला. या ठिकाणी भाजपची अनामत रक्कम जप्त झाली. त्यातबरोबर आंध्रमधील तिरुपती लोकसभा मतदारसंघात सत्तारूढ वायएसआर काँग्रेसने विजय मिळवला. तर तमिळनाडूतील कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने राखला. बेळगावमध्ये भाजप तर केरळमधील मल्लपुरम लोकसभा मतदारसंघात मुस्लीम लीगने विजय मिळवला.