बरोबर २२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताने संपूर्ण जगाला आपली ताकत दाखवून दिली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या त्या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक झाले होते. ११ मे १९९८ रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने केलेल्या अणूस्फोट चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. ११ मे च्या दुपारी ३.४५ च्या सुमारास तीन त्यानंतर दोन दिवसांनी १३ मे रोजी दोन अशा एकूण पाचही अणूस्फोटाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या. भारत अणवस्त्र संपन्न देश बनल्याचा संदेश या चाचण्यांमधून जगभरात गेला.

महत्वाचं म्हणजे अमेरिकेसह जगातील कुठल्याही देशाला काहीही थांगपत्ता लागू न देता भारताने ही मोहिम यशस्वी करुन दाखवली होती. भारताचे दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम भारताच्या या सिक्रेट मिशनचे प्रमुख होते. अणू चाचणी करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही असे भारताचे तत्कालिन परराष्ट्र सचिव के.रघुनाथ यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना सांगितल्यानंतर काही महिन्यातच ही चाचणी करण्यात आली. या अणू चाचणीबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. पाच जणांनाच या चाचणीबद्दल माहिती होती.

त्यावेळी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयए भारताच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन होती. अमेरिकन सॅटलाइटसचे पोखरण रेंजवर लक्ष होते. पण भारतीय वैज्ञानिकांनी या अमेरिकन सॅटलाइटला चकवा देऊन ही चाचणी यशस्वी करुन दाखवली. या प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेले वैज्ञानिक कोड भाषेमध्ये परस्परांशी बोलायचे. नेमके काय चालू आहे हे कोणालाही कळू नये यासाठी वैज्ञानिक सैनिकी गणवेश घालून पोखरण रेंजवर जायचे.

या चाचणीनंतर भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नाराजीचा सामना करावा लागणार होता आणि घडलेसुद्धा तसेच. भारताने ही चाचणी केल्याचे जाहीर करताच अमेरिकेने लगेच परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा स्थगित केली आणि भारतावर निर्बंध लादले. वाजपेयींच्या नेतृत्वलाखाली भारताने त्या सर्व परिस्थितीचा समर्थपणे सामना केला व आपली अणवस्त्र संपन्नता शांततेसाठी असल्याचे जगाला पटवून दिले. त्यामुळेच तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य देशांनी भारताबरोबर अणूऊर्जा करार केला.