संपूर्ण देशी बनावटीच्या ‘हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमन्स्ट्रेटर व्हेइकल’ची (एचएसटीडीव्ही वाहन) यशस्वी चाचणी केल्यामुळे भारताने सोमवारी अमेरिका, रशिया आणि चीनशी बरोबरी साधली आहे. या कामगिरीमुळे भारताला अत्यंत प्रगत अशा ध्वनीपेक्षा वेगवान – हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती शक्य होणार आहे.

भारताने ही कामगिरी करून क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात अभूतपूर्व झेप घेतली आहे. ‘एचएसटीडीव्ही’ हे वाहन ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगवा इंधन तंत्रज्ञानावर आधारित असून ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केले आहे. भारताला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार करण्यास त्याची मदत होणार आहे, असे ‘डीआरडीओ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ओदिशातील एपीजे अब्दुल कलाम प्रक्षेपण संकुलातून ‘एचएसटीडीव्ही’ वाहनाचे उड्डाण करण्यात आले. स्वदेशी ‘स्क्रॅमजेट’ तंत्रज्ञान वापरलेल्या वाहनाने अवकाशात यशस्वी झेप घेतली. सोमवारी सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने निवेदनाद्वारे दिली.

‘एचएसटीडीव्ही’ वाहन स्क्रॅमजेट इंजिनावर चालते. अनेक क्षेपणास्त्रांत रॅमजेट इंजिने वापरतात, पण स्क्रॅमजेट हे त्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान आहे. रॅमजेट इंजिन मॅक ३ इतका वेग वाहनास देऊ शकते, तर स्क्रॅमजेटने हे वाहन ‘मॅक ६’ म्हणजे ध्वनीवेगाच्या सहा पट अधिक वेगाने जाते.

‘डीआरडीओ’चे अधिकारी म्हणाले की ‘एचएसटीडीव्ही’च्या चाचणी उड्डाणामुळे अतिशय गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानात भारत यशस्वी झाला आहे. त्यातून प्रगत स्वनातीत वाहने तयार करता येतील. त्याचबरोबर स्वदेशात प्रगत अशा क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करता येईल.  क्रूझ वाहनाच्या प्रक्षेपणात सर्व घटक योग्य असल्याचे दिसून आले. त्यात स्क्रॅमजेट इंजिनचे अनेक रडार्स आणि विद्युत प्रकाशीय उपकरणे त्याचबरोबर दूरसंदेश केंद्रांच्या माध्यमातून निरीक्षण करण्यात आले. या इंजिनाने चोख कामगिरी बजावल्याचे आढळले.

स्क्रॅमजेट इंजिनाने जास्त दाब आणि तापमान सहन केले असून त्याची कामगिरी बंगालच्या उपसागरात तैनात केलेल्या जहाजातून तपासण्यात आली. या चाचणीतून स्वनातीत वाहनासाठी लागणारे हवागतिकी घटक पूर्णपणे सिद्ध झाले असून स्क्रॅमजेट इंजिनाची इंधन प्रणालीसह इतर बाबीही यशस्वी ठरल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

स्वनातीत क्रूझ वाहनाचे प्रक्षेपण रॉकेट मोटरच्या मदतीने करण्यात आले. त्यामुळे ते वाहन ३० कि.मी. उंचीवर गेले. तेथे त्याची उष्मारक्षक आवरणे वेगळी झाली.  क्रूझ वाहन हे प्रक्षेपक वाहनापासून वेगळे झाल्यानंतर  स्वनातीत स्क्रॅमजेट इंजिनाची इंधन ज्वलन प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर क्रूझ वाहनाने ध्वनीच्या सहा पट वेगाने अपेक्षित मार्गाने हवेतून प्रवास केला. यात स्क्रॅमजेट इंजिनाची कामगिरी आदर्श असल्याचेही संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

संशोधनाचा अर्थ

भारताकडे आतापर्यंत ध्वनीपेक्षा वेगवान- सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करण्याची क्षमता नव्हती, त्यासाठी आपण परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून होतो. या यशस्वी चाचणीने डीआरडीओ स्क्रॅमजेट इंजिनाच्या मदतीने पुढील पाच वर्षांत स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्रे तयार करू शकते. त्याचा वेग सेकंदाला दोन किलोमीटरपेक्षा अधिक असतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग उपग्रह सोडण्यासाठी होणार असून अगदी कमी खर्चात भारत उपग्रह सोडू शकेल. सध्या आपण रशियाच्या मदतीने ब्राह्मोस २ क्षेपणास्त्रे तयार करीत आहोत, यापुढे स्वबळावर ती तयार करता येतील.

क्षणार्धात लक्ष्याचा वेध

– एचएसटीडीव्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने स्क्रॅमजेट वाहनातून दीर्घ पल्ल्याची स्वनातीत क्षेपणास्त्रे सोडली जाऊ शकतात.

– त्यांचा वेग ध्वनीच्या सहा पट जास्त असल्याने जगातील कुठल्याही भागातील लक्ष्य एका तासात भेदता येते.

– साधी क्षेपणास्त्रे बॅलिस्टिक मार्ग वापरतात, तो शत्रूला कळू शकतो. त्यामुळे ती शत्रूला पाडता येऊ शकतात.

– स्वनातीत क्षेपणास्त्रांचा मार्ग शत्रूला कळू शकत नाही. त्यामुळे क्षणार्धात ते लक्ष्याचा वेध घेते.

– स्वनातीत क्षेपणास्त्रे दोन प्रकारची असतात, त्यात एक असते स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र, तर दुसरे असते स्वनातीत ग्लाइड व्हेइकल. सध्या तरी अमेरिका, चीन आणि रशिया यांच्याकडे ती आहेत.

या यशाबद्दल ‘डीआरडीओ’च्या वैज्ञानिकांचे अभिनंदन. ‘एचएसटीडीव्ही’ची चाचणी ही मैलाचा दगड ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारणारे हे यश आहे. वैज्ञानिकांचा आम्हाला अभिमान वाटतो.

राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील हे मोठे यश आहे. या चाचणीमुळे स्वनातीत वाहनांच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. ज्या देशांनी आतापर्यंत हे तंत्रज्ञान यशस्वीरीत्या वापरले आहे त्या देशांशी भारताने बरोबरी साधली आहे.

– जी. सतीश रेड्डी, अध्यक्ष, डीआरडीओ

उपयोग काय?

* अत्यंत प्रगत अशा हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करणे शक्य होईल.

* एचएसटीडीव्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘मॅक ६’ म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या सहा पट अधिक वेगाने क्षेपणास्त्र डागता येते.

* या तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणीमुळे भारताला शत्रूच्या संरक्षण प्रणालीला चकवा देणारी क्षेपणास्त्रे तयार करता येतील.