स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानाच्या क्षमतेबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली असली तरी तरी तेजसवरुन नुकतीच घेण्यात आलेली हवेतून हवेत मारा करणाऱ्या बीव्हीआर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरली. या चाचणीच्या निमित्ताने तेजसने फायटर विमान म्हणून आपली परिणामकारकता आणि क्षमता सिद्ध केली आहे तसेच फायनर ऑपरेशनल क्लियरन्स मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

राफेल या इस्त्रायली कंपनीने बीव्हीआर मिसाईलची निर्मिती केली आहे. भारतीय नौदलाने त्यांच्या निवृत्त झालेल्या सी हॅरीयर्स विमानांसाठी बीव्हीआर मिसाईलस विकत घेतली होती. गोव्याच्या किनाऱ्यावर शुक्रवारी तेजसमधून बीव्हीआर मिसाईल डागण्यात आले. या चाचणीने सर्व निकष पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.

इंडियन एअर फोर्सने तेजस मार्क-१ आवृत्तीच्या ४० फायटर जेटची ऑर्डर दिली आहे. एअर फोर्सला आणखी ८३ तेजस विमाने खरेदी करायची असून त्यासाठी एअर फोर्सने डिसेंबर महिन्यात एचएएला रिक्वेस्ट फॉर प्रपोजल पाठवले आहे. खरेदीपूर्वीची ही एक प्रक्रिया असते. हा एकूण ५० हजार कोटी रुपयांचा व्यवहार आहे. तेजस स्वदेशी बनावटीचे विमान असल्याने त्याची किंमत अन्य फायटर विमानांच्या तुलनेत कमी आहे. पाकिस्तान आणि चीनकडून असलेला धोका लक्षात घेता तेजसच्या समावेशामुळे एअर फोर्सच्या मारक क्षमेतमध्ये नक्कीच वाढ होणार आहे.