अरविंद केजरीवाल यांच्या घरी दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यासोबत कथीत वाईट वागणूक आणि मारहाण प्रकरणावरून दिल्ली सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणावरुन यापूर्वी दिल्लीच्या दोन आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी कोर्टाने या दोघांना जामीन देण्यासही नकार दिला. या परिस्थितीत आपचे आमदार नरेश बालियान यांनी शुक्रवारी वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण केजरीवालांना आणखी अडचणीत आणू शकते.


दिल्लीतील उत्तमनगरचे आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बालियान हे एका सभेत संबोधित कराताना म्हणाले की, मुख्य सचिवांनी जे खोटे आरोप लावले आहेत, त्यासाठी अशा अधिकाऱ्यांना खरोखरच झोडपून काढायला हवे. सामान्य माणसांची कामे अडवून ठेवलेल्या अधिकाऱ्यांना अशीच वागणूक द्यायला हवी. विशेष म्हणजे असे वादग्रस्त व्यक्तव्य बलियान यांनी ज्यावेळी केले त्यावेळी व्यासपीठावर आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते. यापूर्वी केजरीवाल यांनी देखील याच व्यासपीठावरुन लोकांना संबोधीत करताना म्हटले होते की, मी त्या अधिकाऱ्यांशी लढत आहे ज्यांनी आपली कामे रखडवून ठेवली आहेत.

मुख्य सचिवांसारख्या मोठ्या अधिकाऱ्यांबाबत असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही यावेळी केजरीवालांनी कुठलाही विरोध दर्शवला नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे केजरीवाल स्वत: अडचणीत येऊ शकतात.

दरम्यान, एकीकडे अरविंद केजरीवाल या कथित अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचे नाकारत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार या अधिकाऱ्यांविरोधात बोलत असल्याने सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.