ब्रेन टयूमर या आजाराचे नाव ऐकताच अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो. असा गंभीर आजार जडला तर कुठल्याही व्यक्तिचा आत्मविश्वास संपून जाईल. पण या परिस्थितही सोनिया सिंह (३१) वर्षीय महिलेने या गंभीर आजाराशी लढा देत राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेत ब्यूटी क्वीनचा किताब पटकावला. पाचवर्षांपूर्वी सोनियाला अचानक डोकेदुखी आणि खांदेदुखीचा त्रास सुरु झाला. तिला अन्न गिळताना प्रचंड त्रास व्हायचा. अखेर बीजीएस ग्लोबल ग्लेनइग्लस हॉस्पिटलमध्ये जानेवारी २०१३ मध्ये तिच्या आजाराचे निदान झाले.

सोनियाच्या मेंदूमध्ये मेडॉलरी सिस्टिक नावाचा टयूमर असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यावेळी सोनिया तीन महिन्याच्या मुलाची आई होती. खरंतर तिच्यासाठी तो मोठा धक्का होता. पण कोलमडून न जाता सोनियाने खंबीरपणे या आजाराचा सामना केला. टयूमर मेंदूमध्ये ज्या ठिकाणी होता तिथे शस्त्रक्रिया करणे कठिण होते. रुग्णाला जेव्हा डोक्यात टयूमर असल्याचे समजते तेव्हा त्यांना नैराश्य येते त्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिघडते. पण सोनियाने याउलट आपल्या व्यक्तिमत्वात बदल केला. आयुष्याकडे ती अधिक सकारात्मक दुष्टीकोनातून पाहू लागली. तिने स्वत:ची कंपनी सुरु केली.

सोनियाच्या सुदैवाने एकच गोष्ट चांगली घडली ती म्हणजे तिच्या मेंदूतील टयूमर कर्करोगाचा नव्हता. त्यामुळे या आजाराशी लढणे शक्य होते. ती नुकतीच मिसेस इंडिया कर्नाटका स्पर्धेत सहभागी झाली होती. स्पर्धेत हाय हिल्सचे सँण्डल घालून वावरणे इतके सोपे नव्हते. कारण मेंदूचा जो भाग पाठिचा कणा नियंत्रित करतो त्या भागात हा टयूमर आहे. हाय हिल्सचे सँण्डल घालून उभे राहिल्यानंतर आजही मला वेदना होतात. जास्त वेळ उभे राहिल्यानंतर पायाला सूज येते. स्पर्धेदरम्यान पुरेसा आराम न मिळाल्यामुळे सोनियाचा चेहरा देखील सूजायचा असे तिने सांगितले. सोनिया आधी हवाईसुंदरी होती आता ती इतरांमध्ये विश्वास निर्माण करणारी व्याख्याने देते.