येत्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित करतील. पंतप्रधानांचे हे भाषण देशाच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करणारे असल्यामुळे त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. या पार्श्वभूमीवर यंदा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव असावा, यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. मी जेव्हा लाल किल्ल्यावरून बोलत असतो, तेव्हा मी केवळ एखाद्या माध्यमाची भूमिका बजावतो. खरंतर हा देशातील १२५ कोटी जनतेचा प्रतिध्वनी असतो, असे मोदींनी नुकत्याच झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हटले होते.

यानंतर मोदींनी त्यांच्या संकेतस्थळावरून लोकांना देशाच्या विकासासाठी आणि फायद्यासाठी रचनात्मक विचार आणि कल्पना मांडायचे आवाहन केले होते. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान करणार असलेल्या भाषणात नागरिकांनी सुचविलेल्या या मुद्द्यांचा समावेश केला जाईल. नव्या भारताची उभारणी करण्यासाठी तुमच्या या कल्पना पंतप्रधानांना सांगा, असे या संकेतस्थळावर म्हटले होते. संकेतस्थळावरील कमेंट सेक्शनमध्ये लोकांना या कल्पना आणि सूचना मांडायच्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक लोकांनी आपले विचार पंतप्रधानांपुढे मांडले आहेत. यामध्ये शिक्षण, नोकरी, स्वच्छता, पर्यावरण आणि स्त्री-पुरूष समानता अशा विविध मुद्द्यांवर लोकांनी आपली मते मांडली.

… तर मी तुमच्यापेक्षा एक तास जास्त काम करेन; मोदींचे अधिकाऱ्यांना आश्वासन

यापैकी एका युवकाने गेल्या दोन वर्षांमध्ये माझ्या अनेक मित्रांच्या नोकऱ्या गेल्याची व्यथा मांडली. नोकरीला लागल्यानंतर माझे मित्र आयकर भरत होते, या गोष्टीचा त्यांना सार्थ अभिमान होता. मात्र, आता अचानकपणे त्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अशा प्रामाणिक करदात्यांच्या सामाजिक सुरक्षेचा विचार व्हावा. जेणेकरून त्यांचा रोजगार हिरावला गेला तरी त्यांच्या मनात आत्महत्येसारखी नैराश्याची भावना निर्माण होणार नाही. तुमच्या प्रत्येक निर्णयात देश तुमच्यासोबत असल्याचे या तरूणाने म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आता इस्त्रायली श्वानपथक