पाकिस्तानात निवडणूक रॅलीदरम्यान झालेल्या शक्तीशाली आत्मघाती स्फोटांत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने दिले आहे. यामध्ये आवामी नॅशनल पार्टीचे नेते बॅरिस्टर हारुन बिल्लोर यांचाही मृतात समावेश आहे. यकातूत भागात मंगळवारी रात्री हा स्फोट झाला.


स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, १५ लोकांच्या मृत्यूबरोबरच ६६ जण या स्फोटात जखमी झाले आहेत. यातील सर्व जखमींना लेडी रिडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामध्ये ८ किलो इतक्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके वापरण्यात आल्याचे पेशावर शहराच्या पोलिस प्रमुखांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

स्फोटात आवामी पार्टीचे बिल्लोर हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर रुग्णालयात उपचारांसाठी नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. जखमींपैकी २० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.

पेशावरमधील PK-78 या मतदार संघातील बिल्लोर हे उमेदवार होते. प्रसिद्ध नेते बशीर अहमद बिल्लोर यांचे ते पुत्र होते. आवामी पार्टीचे वरिष्ठ नेते बशीर बिल्लोर यांचाही २०१२मध्ये पेशावर येथे झालेल्या आत्मघाती स्फोटात मृत्यू झाला होता. त्यांच्यावर किसा ख्वानी बाजार येथे निवडणूक रॅलीदरम्यानच हल्ला करण्यात आला होता.

या हल्ल्याची निंदा करताना हा लोकशाहीवरील आणि लोकशाही प्रक्रियेवरील हल्ला असल्याची प्रतिक्रिया बिलावल भुट्टो झरदारी यांनी दिली आहे. ज्या दहशतवाद्यांना निवडणुका लढवल्या जाऊ नयेत असे वाटते त्यांनीच हा हल्ला घडवून आणला असल्याचा आरोप झरदारी यांनी केला आहे.