पाकिस्तनामधील क्वेट्टा येथे मोठा आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तीन जणांचा मृत्यू झाला असून, २० जण गंभीर जखमी झालेले आहेत. हा आत्मघातकी हल्ला घडवणारा हल्लेखोर एका दुचाकीवरून आला होते व त्यानंतर त्याने स्वतःला उडवून दिल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेने दिली आहे. याचबरोबर, या हल्लयाची जबाबदारी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान(टीटीपी) या संघटनेने घेतल्याचेही सांगण्यात आले आहे.

वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, हा स्फोट बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टापासून सुमारे २५ किलोमीटर (१५ मैल) दक्षिणेस क्वेट्टा-मस्तुंग रोडवरील पॅरामिलेटरी फ्रंटियर कॉर्प्सच्या एका चौकीवर झाला.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याच्या घटनेवर ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “क्वेट्टा येथील मस्तुंग रोडवरील एफसी चेकपोस्टवर टीटीपीने केलेल्या आत्मघातकी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. या हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना देखील करतो. परकीय दहशतवादी शक्तींचा कट उधळून लावत, आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या आपल्या जवानांना आणि त्यांच्या बलिदानाला मी सलाम करतो.” अशा शब्दांत ट्विट करत पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आत्मघाती हल्लेखोराने त्याची मोटारसायकल चेकपोस्टवरील एका वाहनावर चढवली होती. यामुळे या ठिकाणी घडलेल्या स्फोटात निमलष्करी दलाच्या तीन रक्षकांचा मृत्यू झाला.