इराकमधील सुरक्षा दलांना लक्ष्य करून बगदादच्या दोन उपनगरांमध्ये करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यांमध्ये किमान १४ लोक ठार झाले असून, अनेक जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हुसैनिया या पूर्व उपनगरातील एका तपासणी नाक्यावर  झालेल्या आत्मघातकी कार बॉम्बहल्ल्यात ६ नागरिक व ४ सैनिक ठार झाले, तर आणखी २८ जण जखमी झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एका दहशतवादी संकेतस्थळावर टाकलेल्या पोस्टद्वारे इस्लामिक स्टेट गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

साधारणत: याच वेळी अरब जाबौर या दक्षिण उपनगरातून जात असलेल्या लष्करी वाहनांच्या ताफ्यावरही आत्मघातकी कार बॉम्बहल्ला करण्यात आला. यात चार सैनिक मारले गेले, तर आठ सैनिक जखमी झाले.

अमेरिकेच्या नेतृत्वात इराकी फौजांनी गेल्या अलीकडच्या महिन्यांत अनेक आघाडय़ांवरून आयसिसला मागे पिटाळले असून, २०१४ साली दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेला उत्तर व पश्चिम इराणचा भूभाग परत मिळवला आहे. तथापि, आयसिसने प्रामुख्याने सुरक्षा दले व शिया समुदायाला लक्ष्य करून बगदाद व त्याच्या आसपासच्या भागावरील हल्ले सुरूच ठेवले आहेत.