अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील फरयाब प्रांताच्या मयमाना या राजधानीत बुधवारी आत्मघातकी इसमाने घडवून आणलेल्या बॉम्बहल्ल्यात १७ नागरिक ठार, तर अन्य २६ जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अफगाणिस्तानात पुढील महिन्यात अध्यक्षीय निवडणुका होत असून, अशा प्रकारचे बॉम्बहल्ले सातत्याने होत आहेत.
रिक्षात बसलेल्या या इसमाने बॉम्बचा स्फोट घडवून स्वत:ला उडवून दिले. या हल्ल्यात ठार झालेले बहुतेक जण विक्रेते होते. याखेरीज मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे. प्रांतिक राज्यपाल मोहम्मदुल्लाह पताश यांच्या कार्यालयाच्या जवळचा परिसरही या बॉम्बहल्ल्याने हादरून गेला. या बॉम्बहल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नसली, तरी तालिबानी व अन्य अतिरेकी या भागात कमालीचे सक्रिय असल्यामुळे संशयाची सुई त्यांच्या दिशेनेच वळत असल्याचे सांगण्यात येते.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी या बॉम्बहल्ल्याचा तीव्रपणे निषेध केला आहे.
येत्या ५ एप्रिल रोजी अफगाणिस्तानात अध्यक्षपदाची निवडणूक होत असून, निवडणुकीत अडथळे आणण्याची धमकी तालिबानी संघटनेने दिली आहे.