अफगाणिस्तानची राजधानी काबुल पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरलं आहे. येथे आत्मघाती बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये किमान 45 ते 50 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या काही महिन्यांमधील हा मोठा बॉम्बस्फोट असल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री उशीरा हा आत्मघाती हल्ला झाला.

एका धार्मिक सभेला लक्ष्य करुन हा आत्मघाती बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हा शक्तिशाली बॉम्बस्फोट होता, यामध्ये 60 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आत्मघाती हल्लेखोराने सभेच्या मधोमध जाऊन स्वतःला उडवलं अशी माहिती आहे. घटनास्थळी 30 पेक्षा जास्त रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत.