गेल्या महिन्यात काबूल विमानतळावर हल्ला करणारा आत्मघाती बॉम्बर पाच वर्षांपूर्वी दिल्लीत पकडला गेला होता, असा दावा इस्लामिक स्टेट खोरासनने (आयसिस-के) केला आहे. तसेच भारतातील तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर त्याला अफगाणिस्तानमध्ये हद्दपार करण्यात आले होते, असंही आयसिस-के ने त्यांच्या नुकत्याच जारी केलेल्या मॅगझिनमध्ये म्हटलंय. आयसिस-के ने दावा केलाय की, अब्दुर रहमान अल-लोगरी नावाचा हा आत्मघाती बॉम्बर पाच वर्षांपूर्वी काश्मीरचा बदला घेण्यासाठी भारतावर हल्ला करण्यासाठी दिल्लीला गेला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती.

आयसिस-के ने गेल्या महिन्यात २६ ऑगस्ट रोजी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर आत्मघाती बॉम्बहल्ला केला होता. तालिबानने ताबा मिळवल्यानंतर इतर देश काबूल विमानतळावरून आपल्या नागरिकांना बाहेर काढत असताना हा हल्ला करण्यात आला होता. या  हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिकांसह १८० हून अधिक लोक मारले गेले होते.

दरम्यान, आयसिस-के २०२० पासून त्यांची मॅगझिन प्रकाशित करत आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्ली दंगलीच्या वेळी त्यांनी मॅगझिनची आवृत्ती प्रकाशित केली होती. त्यानंतर, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयसिस-केशी संबंध असल्याच्या आरोपाखाली जहानझैब सामी (३६) आणि त्याची पत्नी हिंदा बशीर बेघ (३९) या काश्मिरी जोडप्याला अटक केली होती. तसेच याच आरोपींखाली आणखी तीन जणांना देखील या दोघांसोबत अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने या प्रकरणाचा ताबा घेत या सर्वांवर आरोपपत्र दाखल केले होते.

आतापर्यंत, आयसिस-के च्या मॅगझिनशी संबंध असल्याच्या संशयावरून भारतभरातून १० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे.