सध्याचे ‘सुटाबुटातील’ सरकार पूर्वीच्या ‘सुटकेस’ सरकारपेक्षा निश्चितच चांगले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, मोदींनी विरोधकांच्या आक्षेपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. विरोधकांकडून ‘सुटाबुटातील’ सरकार म्हणून हिणवण्यात येणाऱ्या या सरकारला देशातील जनतेने पूर्वीच्या ‘सुटकेस’ सरकारपेक्षा अधिक प्रमाणात स्विकारल्याचेही मोदींनी यावेळी म्हटले. गेली ६० वर्षे राज्य केल्यानंतर काँग्रेसला आत्ता अचानकपणे गरिबांची आठवण झाली आहे. काँग्रेसच्या अपुऱ्या धोरणांमुळे गेली अनेक वर्षे लोकांना हालअपेष्टांचा सामना करावा लागला आणि ते गरिबच राहिले. दरम्यानच्या काळात जगातील अनेक देशांनी गरिबी उच्चाटनाच्याबाबतीत भारताला बरेच मागे टाकले. मात्र, काँग्रेसने जाणुनबुजून हा प्रश्न खितपत ठेवला. जेणेकरून पुढील निवडणुकीमध्ये त्यांना या मुद्द्याचे भांडवल करता यावे, असे सांगत मोदींनी काँग्रेसवर तुफानी हल्ला चढवला. काँग्रेसच्या काळातील कोळसा आणि राष्ट्रकुल घोटाळे हे गरिबांच्या भल्यासाठी होते काय, असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला. देशातील मोजक्या उद्योजकांना आणि कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हे सर्व करण्यात आल्याचे सत्य सगळ्यांनाच माहिती आहे. काँग्रेसने ६० वर्षांच्या राजवटीत केलेले राजकारण आणि कारभाराच्या पद्धतीमुळे गरिबीचा मुळ प्रश्न आजही कायम आहे. देशातील अनेक लोकांसाठी आजही निवारा, आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज आणि रस्ते यांसारख्या मुलभूत गोष्टी स्वप्नवतच राहिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर गरिबांच्या बाजुचे असल्याचा दावा करत असाल, तर अजूनपर्यंतही देशात गरिबी कायम का आहे, असा सवाल मोदींनी काँग्रेससमोर उपस्थित केला.