भारताच्या परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेताना पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास आपले प्राधान्य असेल, असे प्रतिपादन सुजाता सिंग यांनी केले. त्याचबरोबर पाकिस्तानकडून दहशतमुक्त वातावरणाची तसेच सहकार्याची आपल्याला अपेक्षा आहे, असेही सिंग यांनी नमूद केले. पाकिस्तानशी शांततेचे आणि सहकार्य करणारे संबंध प्रस्थापित करणे हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे कायमच अविभाज्य अंग होते. अर्थात त्यासाठी दहशतमुक्त वातावरणाची पाश्र्वभूमी असणे अपेक्षित होते, आताही तीच अपेक्षा आहे असे नव्या परराष्ट्र सचिवांनी सांगितले. सुजाता सिंग या परराष्ट्र सचिव होण्यापूर्वी जर्मनीत राजदूत म्हणून कार्यरत होत्या. ५९ वर्षीय सिंग या १९७६ सालच्या भारतीय परराष्ट्र सेवेच्या अधिकारी असून त्यांची सचिवपदावर दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.